विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी घाटनांद्रा परिसरात जि.प. शाळेच्या गुरुजींची धडपड:विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढीचा ध्यास; जिल्हापरिषदेचा शिक्षक आपल्या दारी उपक्रम
![]()
प्रतिनिधी | घाटनांद्रा सध्याच्या काळात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शाळेतील घटती पटसंख्या ही शिक्षण क्षेत्रासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांनी एक अनोखा पुढाकार हाती घेत ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक उन्हाची तिव्रता असतानाही गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन पालकांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक मे पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहे.या पार्श्वभूमीवर नवीन विद्यार्थी आपल्या शाळेत दाखल व्हावा. यासाठी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेचे शिक्षक सकाळपासून ते दुपारपर्यंत घराघरांत भेटी देऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेत त्यांची नावे नोंदवली जात आहेत. शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक विशेष समुपदेशन करत आहेत. काही पालक आर्थिक अडचणी, तर काहीजण स्थलांतरामुळे मुलांना शाळेत पाठवू शकत नाहीत, अशा विविध कारणांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यात येत आहेत. शिक्षक केवळ प्रवेशासाठी आग्रह करत नाहीत, तर शासनाच्या विविध शैक्षणिक योजना, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार यांचीही माहिती देऊन पालकांचा विश्वास संपादन करत आहेत. तसेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण किती आवश्यक आहे, याची पालकांना जाणीव करून दिली जात आहे. या उपक्रमामुळे गावात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत तयारी दर्शवली असून काही विद्यार्थ्यांचे प्रवेशही निश्चित झाले आहेत. हा उपक्रम पटसंख्या वाढविण्यासाठी नव्हे, तर समाजात शिक्षणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरत आहे. आगामी वर्षात घाटनांद्रा परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या कामामध्ये मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर, सहशिक्षक ईश्वर तांगडे, विजय पानतावणे, सागर ठाकरे, भारत शिंदे, शुभम शिंदे आदी कर्मचारी परिश्रम घेत आहे. उपक्रमातून घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. पालकांशी संवाद साधत आहोत. उपक्रमामुळे पालकांत जागरूकता वाढत असून अनेकांनी मुलांना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होईल, असा विश्वास आहे, असे मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर म्हणाले.
