नांदेड (प्रतिनिधी) – डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी नांदेडमधील एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 14 लाख 15 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नांदेड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून ते 4 जुलै 2026 या कालावधीत पवननगर, तरोडा (खुर्द) येथील रहिवासी शिवाजी संभाजी तुंबलवाड (वय 67) यांना काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. आरोपींनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या नावाचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा बनाव रचला. तसेच डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला. या भीतीपोटी फिर्यादीकडून आरोपींनी विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे एकूण 14.15 लाख रुपये आपल्या खात्यात वळते करून घेतले. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी प्रिया मंडम, अमितकुमार चौधरी, संदीप यादव, प्रदीप जयस्वाल तसेच मोबाईल क्रमांकधारकांसह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस)-2023 मधील कलम 318(2), 318(4), 319(2), 308(6), 308(7), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करीत आहेत. दरम्यान, नागरिकांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली येणाऱ्या फोन, व्हिडिओ कॉल किंवा ऑनलाइन पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, कोणतीही रक्कम हस्तांतरित करू नये आणि तत्काळ सायबर हेल्पलाइन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Post Views: 5
