नांदेड (प्रतिनिधी) – अखिल भारतीय जिवासेना संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील नवीन कौठा येथील शिवरत्न जिवाजी महाले चौकात शिवरत्न जिवाजी महाले यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, तसेच त्या परिसराचा सर्वांगीण विकास करून तो ऐतिहासिक व प्रेरणादायी स्मारक म्हणून विकसित करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे महापौर व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्वराज्याच्या इतिहासात शिवरत्न जिवाजी महाले यांचे शौर्य, निष्ठा आणि पराक्रम अतुलनीय असून त्यांच्या कार्याचा गौरव भावी पिढ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन कौठा परिसरातील शिवरत्न जिवाजी महाले चौक हा त्यांच्या नावाने ओळखला जात असल्याने त्या ठिकाणी भव्य अश्वारूढ पुतळा उभारल्यास इतिहासाला योग्य न्याय मिळेल आणि नागरिकांमध्ये स्वाभिमानाची भावना अधिक दृढ होईल.
निवेदनात केवळ पुतळा उभारण्याचीच नव्हे, तर पुतळ्याभोवती आकर्षक सुशोभीकरण, अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, नागरिकांसाठी प्रशस्त आसन व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक कठडे, हरित परिसराची निर्मिती तसेच शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जीवनकार्याची माहिती देणारा माहिती फलक उभारण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास हे ठिकाण शहरातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला.
यावेळी जिवासेनेच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तसेच महापौर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रशासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेऊन आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि पुतळा उभारणीचे काम विलंब न लावता सुरू करावे, अशी आग्रही भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली..श्याम जाधव यांनी सांगितले की, शिवरत्न जिवाजी महाले यांचे शौर्य आणि बलिदान हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अमूल्य वारसा आहे. त्यांच्या स्मृती जतन करणे ही समाजाची नैतिक जबाबदारी असून अश्वारूढ पुतळ्याच्या माध्यमातून नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळेल. तसेच नवीन कौठा परिसराचा विकास होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि नागरिकांसाठी अभिमानाचे स्थळ निर्माण होईल.
या निवेदनावेळी अखिल भारतीय जिवासेना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख गंगाधर जाकारे, कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीशचंद्र शिंदे, मराठवाडा युवक अध्यक्ष श्याम जाधव, नांदेड जिल्हाध्यक्ष मारोती उर्फ बाळू पवार, नांदेड युवक जिल्हाध्यक्ष सुरेश खुळखुळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी संघटनेने स्पष्ट इशारा दिला की, प्रशासनाने या मागणीवर लवकर सकारात्मक निर्णय घेऊन पुतळा उभारणी व परिसर सुशोभीकरणाची कामे तातडीने सुरू करावीत. अन्यथा शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि समाजबांधवांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. शिवरत्न जिवाजी महाले यांच्या कार्याला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय जिवासेना संघटना शेवटपर्यंत संघर्ष करेल, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
Post Views: 190
