प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिल्याने महिलेसह चौघांना मारहाण:बाणेरमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, निवडणुकीच्या वादातून प्रकार




पुणे जिल्ह्यातील बाणेर परिसरात प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या रागातून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली आहे. टोळक्याने महिलेसह चौघांना बेदम मारहाण केल्याची ही घटना घडली असून, या प्रकरणी बाणेर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, रा. धनशीला बंगला, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, प्रणित प्रमोद निम्हण, प्रणय प्रमोद निम्हण, प्रसन्न रामभाऊ निम्हण, संदीप नामदेव निम्हण आणि परवेज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी धनकुडे यांच्या नणंद सरला बाबुराव चांदेरे यांचे पती बाणेरमधून निवडणूक लढवत आहेत. धनकुडे कुटुंबीयांनी चांदेरे यांना पाठिंबा दिल्याने निम्हण कुटुंबीय संतप्त झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याणी धनकुडे त्यांच्या बंगल्याच्या परिसरात थांबल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरू असताना आरोपी निम्हण हे धनकुडे यांच्या बंगल्यात शिरले. त्यांनी धनकुडे यांच्या मोटारीवरील चालक सचिन उत्तम फासगे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यात फासगे जखमी झाले. यानंतर आरोपींनी कल्याणी यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. कल्याणी यांना वाचवण्यासाठी आलेल्या नवनाथ देशमुख यांनाही आरोपींनी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कल्याणी यांच्या नातेवाईक सायली निलेश शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. आरोपी प्रणित निम्हण याने ‘निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला बघून घेतो,’ अशी धमकी दिल्याचे कल्याणी धनकुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कल्याणी यांनी फिर्याद दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गर्दी करून मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक आयुक्त विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *