![]()
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी हे बहुमत काठावरचे असल्याने राजकीय वर्तुळात ‘घोडेबाजारा’ची चर्चा सुरू झाली आहे. फोडाफोडीच्या भीतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. महापालिकेत महापौर आणि स्थायी समिती सभापती यांसारखी महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी आपली ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवण्याचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. या अनपेक्षित हालचालीमुळे आगामी काळात सत्तास्थापनेसाठी महायुतीमध्ये अंतर्गत रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या असताना, शिवसेना शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी या कृतीमागचे नेमके कारण स्पष्ट करत विरोधकांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. नवख्या नगरसेवकांसाठी हॉटेलमध्ये शिबिर शीतल म्हात्रे म्हणाल्या, आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो आहोत, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. आम्ही महायुती म्हणूनच सत्तेत येणार आहोत. तसेच नगरसेवकांना हॉटेलवर ठेवण्यात आल्यासंदर्भात त्या म्हणाल्या, आमचे जवळपास 20 नगरसेवक नवखे आहेत, त्यांना मनपाचे कामकाज माहित नाही. त्यामुळे त्यांच संदर्भाने दोन दिवसीय शिबिर घेतले आहे. त्यासाठीच हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत. हे उबाठाच्या नगरसेवकांना हरवून आले आहेत, असेही म्हात्रे म्हणाल्या. इतकेच नव्हे तर महायुती ही बाळासाहेब यांनी केलेली नैसर्गिक युती आहे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीचा हा विषय नसल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊतांवर बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाश्ता करण्यासाठी हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये जाणार आहेत, यावर शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देताना बोचरी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, संजय राऊत म्हणजे चाकरी सिल्व्हर ओकची आणि भाकरी मातोश्रीची असे आहे. सगळ्यांना खड्ड्यात घातले, खासदारकी संपत आली आहे. तीही शिंदेंच्या कृपेमुळे आली होती. नगरसेवकांना मस्का मारायला येणार असतील नाहीतर मला शिंदेंकडे घेऊन चला म्हणायला येतील, असा टोलाही म्हात्रे यांनी लगावला आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक 114 हा आकडा गाठण्यासाठी भाजपकडे 89 जागा असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मदत घेणे अपरिहार्य ठरले आहे. या स्थितीचा फायदा घेत शिंदे गटाकडून महापौरपदाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र आणि स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्वाची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या या अटी-शर्तींच्या राजकारणामुळे आणि संभाव्य वाटाघाटींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून, महायुतीमधील सत्तेचे हे समीकरण नेमके कसे जुळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवले?:विरोधकांचे आरोप फेटाळत शीतल म्हात्रेंनी स्पष्टच सांगितले; संजय राऊतांवरही टीका
