![](https://nandedlive.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241203-WA0032.jpg)
राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्राचा अंतिम निकाल जाहीर
वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘गंमत असते नात्याची’ ही नाटके अंतिम फेरीसाठी पात्र
नांदेड- ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नांदेड केंद्रातून तन्मय ग्रुपच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. परभणीच्या राजीव गांधी युवा फोरमच्या ‘गंमत असते नात्याची’ या नाटकास द्वितीय क्रमांक मिळाला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी या निकालांची घोषणा केली. नांदेड येथील कुसुम सभागृहात ता.२५ नोव्हेंबर ते ता.६ डिसेंबर दरम्यान आयोजित प्राथमिक फेरीत एकूण १२ नाटके सादर करण्यात आली. तृतीय क्रमांकासाठी स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेच्या ‘व्हाईट पेपर’ या नाटकाची निवड झाली आहे. परीक्षक म्हणून देवदत्त पाठक, नंदकुमार सावंत आणि डॉ. माणिक वड्याळकर यांनी काम पाहिले.उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक नागेश लोकडे (वसुधैव कुटुंबकम्) आणि क्रांती दैठणकर (सेल्फी) यांना मिळाले. तसेच विविध नाटकांतील कलाकारांना गुणवत्ता प्रमाणपत्रांनी गौरवण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यशस्वी संघ व कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. यातील ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘गंमत असते नात्याची’ ही नाटके अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत. या स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून किरण चौधरी आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.
प्रमुख पारितोषिकांचे वितरण पुढीलप्रमाणे झालेः
• दिग्दर्शन:
• प्रथम – नाथा चितळे (वसुधैव कुटुंबकम्)
• द्वितीय – विजय करभाजन (गंमत असते नात्याची)
• प्रकाशयोजना:
• प्रथम – चेतन ढवळे (वसुधैव कुटुंबकम्)
• द्वितीय – श्याम चव्हाण (व्हाईट पेपर)
• नेपथ्य:
• प्रथम – भिमाशंकर कुलकर्णी (वसुधैव कुटुंबकम्)
• द्वितीय – किरण टाकळे (व्हाईट पेपर)
• रंगभूषा:
• प्रथम – गजस्विनी देलमाडे (वसुधैव कुटुंबकम्)
• द्वितीय – शांता देसाई (व्हाईट पेपर)
अभिनयासाठी मोनिका गंधर्व, नीलिमा चितळे, अर्चना चिक्षे, सुषमा कुलकर्णी, किशोर पुराणिक, गौतम गायकवाड,आदित्य उदावंत आणि चंद्रकांत तोरणे यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे मिळाली.
Post Views: 91