पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा:मुलीचा छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला वडिलांनी कॅम्पसमध्येच दिला चोप, घटनेचा व्हिडिओ व्हायरल


पुण्यातील नामांकित MIT ADT विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरून एका विद्यार्थिनीचा सतत छळ करणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या संतप्त वडिलांनी थेट कॉलेज परिसरात जाऊन जाब विचारत मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून डी. वाय. पाटील कॉलेजचा एक विद्यार्थी त्या विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून वारंवार मेसेज पाठवत होता. तसेच तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली होती. अखेर तिने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल
मुलीच्या तक्रारीनंतर संतप्त झालेले वडील थेट विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पोहोचले आणि संबंधित विद्यार्थ्याला पकडले. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानंतर संतापाच्या भरात वडिलांनी त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान, या घटनेमुळे कॉलेज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि ऑनलाइन छळाच्या वाढत्या घटनांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी मुलीच्या सुरक्षिततेसाठी वडिलांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी कायदा हातात घेणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. अशा प्रकरणांमध्ये थेट पोलिसांकडे तक्रार देणे आवश्यक असल्याचेही अनेकांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *