![]()
मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या देखरेखीखाली या निधीचे थेट बँक खात्यात वाटप सुरू झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावर्षीच्या आषाढी एकादशी वारीसाठी येणाऱ्या दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी ८० लाख रुपयांचे वित्तीय अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची आणि भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या वारीमध्ये प्रामुख्याने कष्टकरी, शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने सहभागी होतात. वारकरी बांधवांना सुयोग्य सोयी-सुविधा पुरवणे आणि वारीचे सूक्ष्म नियोजन करणे या हेतूने शासनाने दिंड्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षामध्ये एकूण १ हजार ४०० दिंड्यांना हे अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत, १ हजार १९९ पात्र दिंड्यांपैकी १ हजार दिंड्यांचे बँक तपशील प्राप्त झाले असून, त्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. उर्वरित १९९ दिंड्यांच्या बँक खात्यांचे तपशील प्राप्त होताच तात्काळ निधी वर्ग केला जाईल. तसेच, वारीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ४१ नवीन दिंड्यांच्या बाबतीतही आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे. ज्या दिंड्यांचे बँक तपशील अद्याप प्राप्त झालेले नाहीत, अशा दिंडी प्रमुखांनी आपले बँक खाते आणि आवश्यक तपशील संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे किंवा विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांच्याकडे त्वरित सादर करावेत. यामुळे अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात विनाविलंब जमा करता येईल, असे आवाहन मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.
मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या दिंड्यांना 2.80 कोटींचे अनुदान मंजूर:मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत प्रति दिंडी 20 हजार वाटप सुरू
