![]()
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत अंजनगाव सुर्जी तालुका काँग्रेस कमिटीच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेनंतर अंजनगाव सुर्जी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रमोद दाळू यांची फेरनियुक्ती करण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी शनिवारी या फेरनियुक्तीची अधिकृत घोषणा केली. प्रमोद दाळू यांच्या कार्याचा गौरव करत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी जिल्ह्याचा दौरा करून स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेनंतर विविध तालुक्यांच्या अध्यक्षपदाबाबतच्या शिफारशी प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या. या शिफारशींचा विचार करून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली. प्रमोद दाळू यांच्या मागील अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काँग्रेसने अंजनगाव सुर्जी तालुक्यात संघटनात्मक पातळीवर भक्कम बांधणी केली होती. त्यांनी बूथ स्तरापासून पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले. कार्यकर्त्यांशी समन्वय साधत त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांना गती दिली आणि काँग्रेसचा जनसंपर्क अधिक व्यापक केला. त्यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गजानन लवटे विजयी झाले. या सलग यशात प्रमोद दाळू यांनी केलेले संघटनात्मक नियोजन, कार्यकर्त्यांची प्रभावी फळी आणि मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवणे या बाबी महत्त्वाच्या ठरल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. फेरनियुक्तीची घोषणा होताच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्त्यांनी प्रमोद दाळू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रमोद दाळू अंजनगाव सुर्जी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी पुन्हा नियुक्त:जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली अधिकृत घोषणा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
