![]()
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली असून, अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कडक कारवाया केल्या जात आहेत. या धडक मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असतानाच राज्यात मुंढे यांच्या बदलीच्या जोरदार चर्चाही रंगू लागल्या होत्या. मात्र, या चर्चांच्या पार्श्वभूमीवरही कारवाईचा धडाका सुरूच असून, नुकतीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे एफडीएने धडक कारवाई केली आहे. ज्यामध्ये तब्बल 2 लाख 11 हजार रुपये किमतीची 1,125 किलो दूध पावडर जप्त करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात अन्न व औषध प्रशासनाने भेसळीविरोधी मोहिमेअंतर्गत धडक कारवाई करत, बाळासाहेब घोडके यांनी विनापरवाना साठवून ठेवलेली तब्बल 1,125 किलो दूध पावडर जप्त केली आहे. या कारवाईत 61 बॅगांमधून सुमारे 2 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, प्रशासनाच्या या कठोर पावलामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परिसरातील भेसळखोरांचे धाबे दणाणले याप्रकरणी भूम पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खवा, पेढा आणि विविध दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या भूम तालुक्यात भेसळीच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याचीच गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या कठोर पावलामुळे परिसरातील भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहाव्यात, अशी मागणी आता ग्राहकांकडून जोर धरू लागली आहे. कडक नियम लागू केले जाणार भूमप्रमाणेच नाशिकमधील एका प्रसिद्ध हॉटेलवरही प्रशासनाने नुकतीच अशीच मोठी कारवाई केली असून, तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा प्रामुख्याने दुधातील भेसळीकडे वळवला आहे. ‘ग्राहकांच्या ताटापर्यंत अगदी शुद्ध आणि दर्जेदार दूध पोहोचणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे’, अशी स्पष्ट भूमिका मुंढे यांनी मांडली आहे. नागरिकांना कायम भेसळमुक्त दूध मिळावे यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, यापुढे दूध उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी काही नवे व कडक नियम लागू केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई:तब्बल 2 लाख 11 हजार रुपये किमतीची 1125 किलो दूध पावडर ताब्यात, भेसळखोरांचे धाबे दणाणले
