ट्रम्प सांगतात चार आठवड्यात इराण समाप्त;इराण सांगते आम्ही अजून भरपूर काही लपवून ठेवले आहे 


राण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेले युद्ध आता संपूर्ण मध्यपूर्वेत धगधगत आहे. या संघर्षाने मानवतेलाच काळिमा फासला आहे. कोणत्याही राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या नावाखाली निरपराध नागरिकांवर, शाळांवर, रुग्णालयांवर आणि वस्तीभागांवर हल्ले करणे हे कधीच न्याय्य ठरू शकत नाही.

एका मुलींच्या शाळेवर झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात शेकडो निष्पाप मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. लहान बालकांचे जीव गेले, कुटुंबे उद्ध्वस्त झाली. इराणमध्ये मृतांची संख्या पाचशेच्या पुढे गेल्याचे सांगितले जाते, तर जखमींची संख्या हजारोंमध्ये आहे. प्रत्यक्ष आकडे किती आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही; परंतु नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे, हे निर्विवाद आहे. युद्धात सत्य हे सर्वप्रथम जखमी होते मृतांचा आणि जखमींचा खरा आकडा अनेकदा धूसर ठेवला जातो.
पेंटागॉनने काही अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली आहे; मात्र प्रत्यक्ष नुकसान किती, याबाबत विविध दावे-प्रतिदावे सुरू आहेत. युद्धाच्या धुरात आकडेही राजकारणाचे साधन बनतात.

इराणचे म्हणणे आहे की त्यांनी केवळ त्या ठिकाणांवर कारवाई केली जिथे अमेरिकन सैन्य किंवा त्यांना मदत करणारी यंत्रणा असल्याचा संशय होता. अरब राष्ट्रांतील सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा त्यांचा उद्देश नसल्याचे ते सांगतात. परंतु कोणतीही खाजगी इमारत, शाळा किंवा रुग्णालय लक्ष्य झाले तर त्याचे समर्थन होऊ शकत नाही. युद्धात “कायदेशीर” या शब्दाचा आधार घेतला जातो; पण मानवी जीवनापेक्षा मोठे कोणतेही कायदे नसतात.

दुसरीकडे, अमेरिकेच्या नेतृत्वाकडून कठोर विधाने केली जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प  यांनी इराणविरोधात आणखी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिल्याचे वृत्त आहे. तर बेंजामिन नेतान्याहू  यांच्या भूमिकेमुळे संघर्ष अधिक तीव्र होत असल्याची टीका होत आहे. युद्धाचा शेवट पूर्ण विनाश असा शब्दप्रयोग करून करण्याची भाषा ही अधिक धोकादायक ठरते.

इराणकडूनही दररोज मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले करण्याचे दावे केले जात आहेत. प्रगत शस्त्रसाठा, तथाकथित अंतिम अस्त्रे, आणि शेकडो लक्ष्यांवर एकाच वेळी हल्ला करण्याच्या क्षमतेच्या घोषणा हे सर्व संघर्षाला आणखी भडकावणारे आहे. अशा घोषणांमुळे भीती आणि अस्थिरता वाढते; शांतता दूर जाते.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून आपल्या देशाला पाठिंबा देत असल्याचे चित्र दिसते. मात्र राष्ट्रभावना आणि सूडाची भावना यांत फरक ओळखणे गरजेचे आहे. सूडाच्या ज्वाळांत सामान्य माणूस होरपळतो.

भारताचे खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. रमजानसारख्या पवित्र महिन्यात झालेल्या कारवायांबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आणि भारत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच परदेशात कार्यरत असलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी केली. मध्यपूर्वेत मोठ्या संख्येने भारतीय नागरिक कार्यरत असल्याने त्यांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

युद्ध कधीच कोणाचेही भले करत नाही. ते केवळ विध्वंस, अश्रू आणि पिढ्यान्‌पिढ्या चालणारी वैरभावना मागे ठेवते. निरपराध मुलांच्या रक्तावर कोणतेही राजकारण उभे राहू नये. आंतरराष्ट्रीय समुदायाने तात्काळ युद्धविरामासाठी पुढाकार घ्यावा, संवादाचे दरवाजे उघडावेत आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवून तोडगा काढावा—हीच काळाची गरज आहे. पवित्र रमजान महिना झालेला हा हल्ला मुस्लिम जगतात काहीतरी नाविन्यपूर्ण घडवेल असे सुद्धा बोलले जात आहे.


Post Views: 36






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *