![]()
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक निकालानंतर भाजपला १२० ते १२५ जागा मिळतील, असेही त्यांनी म्हटले. मोहोळ म्हणाले की, पुणेकरांनी मागील निवडणुकीत कारभार बदलला होता. यंदा शिवसेनेसोबत युती होऊ शकली नाही. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असून, सत्तास्थापनेसाठी कोणाचीही गरज लागणार नाही. निवडणूक मतदान प्रक्रिया संपल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांनी प्रभाग क्रमांक २५ मधील स्वरदा बापट यांच्या कार्यालयात उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत ‘भेळ भत्त्या’चा आनंद घेतला. यावेळी मोहोळ यांनी भाजपची वर्षानुवर्षे चालत आलेली ‘भेळ भत्त्या’ची परंपरा स्पष्ट केली. कसबा मतदारसंघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जुन्या लोकांनी घालून दिलेली ही परंपरा असून, संघटनेत काम करताना सर्वांनी एकत्र राहावे, हीच भावना यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी मिळाली असो वा नसो, कार्यकर्ते एकदिलाने काम करतात, असेही ते म्हणाले. मोहोळ यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. अनेक ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने काही जण आतापासूनच निकालानंतर तक्रारी करण्याची तयारी करत आहेत. विरोधक ईव्हीएम मशीनच्या नावाखाली निकालानंतरही आरोप करत बसतील, असे ते म्हणाले. पुण्यात भाजपने अनेक विकासकामे केली आहेत, असेही त्यांनी नमूद केले. राज्यात आणि केंद्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असले तरी, स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी अपेक्षा होती. मात्र, समोरून काही गोष्टी आल्यास प्रत्युत्तर दिले जाते, असे मोहोळ म्हणाले. गुंड निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप अजित पवार यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. आता अजित पवार याबद्दल काही बोलत नाहीत, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार:125 जागांचा टप्पा पार करू, मुरलीधर मोहोळ यांचा मोठा दावा
