“I Will Repay the Debt of Love Through Development” – Deputy CM Eknath Shinde on Chhatrapati Sambhajinagar | हे प्रेमाचं कर्ज विकासाने फेडणार- उपमुख्यमंत्री: ‘वेळ काय मागताय? मी तर 24 तास जनतेसाठीच रेडी,’ एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला – Chhatrapati Sambhajinagar News



“मी टिपिकल राजकारणी नाही, तर सामान्यांच्या प्रश्नांना भिडणारा शिवसैनिक आहे. छत्रपती संभाजीनगर हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर आहे. ही निवडणूक म्हणजे माझ्यासाठी ‘ऋणफेडीची संधी’ आहे. या शहराने शिवसेनेला दोन आमदार आणि एक खासदार दिले आहेत. आता

.

प्रश्न : युवकांसाठी काही करण्याचा उल्लेख केला, त्याबद्दल काही सांगणार ? शिंदे : युवक आणि क्रीडा माझ्या अजेंड्यावर आहेत. युवा वर्गाला रोजगार – स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी शिवसेनेतर्फे नियमित मार्गदर्शन शिबिरे आयोजित होतील. हा झाला एक भाग, दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर औद्योगिक दृष्टीनं वेगानं विकसित होत आहे. लवकरच ही मोठी उद्योगनगरी होणार अशावेळी स्थानिकांना रोजगार देण्याचा आमचा निर्णय आहे. इथल्या उद्योगांशी महानगरपालिका सामंजस्य करार करेल आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. स्वयंरोजगार मिळावा यादृष्टीने काही छोटे प्रकल्प घेऊ जेथे अनेक कौशल्ये शिकता येतील. हे महापालिकेचे स्कील डेव्हलपमेंट सेंटर असेल. क्रीडा क्षेत्र विकास आणि उद्यानांमधून ज्येष्ठांसाठी ट्रॅक हे काही विषय असतील. प्रश्न : दोन दिवसांपूर्वी आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभाही घेतली, काय म्हणतंय वातावरण? शिंदे : मी टिपिकल राजकीय उत्तर देणार नाही. शिवसेना परमुखांवर ज्या शहराने प्रेम केलंय, त्या वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपत असताना मलाही तेच प्रेम मिळत आले. खासदार आणि दोन आमदार या शहराने शिवसेनेला दिले. शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नपूर्तीची संधी यानिमित्ताने मला मिळाली आहे. जनतेने एवढे प्रेम केलंय की हे ऋण आता फेडण्याची संधी आहे आणि मी फेडणार ते विकास कामातून. बघाल तुम्ही, येत्या काही वर्षांत शहराचा कायापालट करून दाखवू. जनतेच्या प्रेमाचे कर्ज फेडण्यासाठी यापेक्षा चांगली संधी येणार नाही. प्रश्न : आश्वासनं हा निवडणूक प्रचाराचा भाग असतो, सगळेच पक्ष सांगतात, मोठी स्वप्नं दाखवतात…? शिंदे :..एक मिनिट! हा एकनाथ शिंदे इतरांसारखा नाही. ते इतर कोण हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण हा शब्द आहे माझा, वचन देतोय, आज माझे शिवसैनिक, माझे नगरसेवक त्यांचे प्रभाग आणि माझा महापौर या शहराच्या विकासासाठीच काम करेल. त्याचं प्रगती पुस्तक मी नियमित मागवणार. केलेल्या कामांची माहिती घेत राहणार आणि विकास दिशा कशी पाहिजे यासाठी टीम असेल. सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग माझा प्रांत आहे. शिवाय नगरविकास माझ्याकडे आहे. या शहराला काहीही कमी पडू देणार नाही. प्रश्न : काय कारण आहे याचं? म्हणजे तुम्हाला का वाटतं की तुमची कामगिरी चांगली राहील? शिंदे : दोन गोष्टी आहेत एक तर छत्रपती संभाजीनगरने शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर प्रेम केलं, कधीकाळी भरभरून दिलं. मधला काळ सोडून द्या, आता पुन्हा तो वारसा धनुष्यबाणासह आहे. ती दिशा इथे आहे हा एक भाग. दुसरं म्हणजे मी भावनिक मुद्द्यांना समोर न ठेवता प्रगतीचा, विकासाचा विचार घेऊन प्रचारात आलो आहे. मला कुठेही हा फोकस ढळू द्यायचा नाही. कारण छत्रपती संभाजीनगर एका मोठ्या महानगरात बदलायचं असेल तर ठाम निर्णय घेणारे माझ्यासारखे शिवसैनिक पाहिजेत. ज्यांच्यात ही धमक आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की इथली जनता त्यांच्या हक्काच्या माणसांना निवडून देणार जे त्यांच्या शहरासाठी दिन रात एक करतील. प्रश्न : आपल्या संकल्पनेतील विकासकामे कोणती ? शिंदे : माझ्या सभेत मी शहराला दिलेला वचननामा हे माझा संकल्पचित्र आहे. मी शब्द दिला तो पाळण्यासाठी. माझ्याकडे संकल्पना आहेत सोबत त्या पूर्ण करण्याची जिद्द आहे. येत्या पाच वर्षांत काही गोष्टींना प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. प्रश्न : प्राधान्यक्रम काय राहणार ? शिंदे : मी आधी म्हणालो तसं नगरविकास खाते माझ्याकडे आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरने भविष्यातील नगर नियोजन बाबतीत निःशंक राहावं. त्यांच्या अपेक्षेला आम्ही पूर्णपणे खरे उतरू. शहराच्या विकास आराखड्याबाबत अनेक वर्षे झालेला गोंधळ निस्तारून एक सुसूत्र नियोजन करायचे, भविष्यातील किमान २० वर्षांचा विचार करून काम करायचे. त्यामुळे अजेंड्यावर विकास आराखडा, वाढीव चटईक्षेत्र मागणीचा विचार, गुंठेवारीचा थोडाबहुत गुंता दिसतोय तो सोडवून जनतेला दिलासा देऊ. प्रश्न : छत्रपती संभाजीनगर कितीतरी वर्षांपासून पाण्यासाठी झगडत आहे…? शिंदे : अहो, हा मुद्दा आता माझ्या दृष्टीनं सुटलेला प्रश्न आहे. कारण पूर्वीच्या तुमच्या स्थानिक लोकांनी योजनेला स्पीड देण्यापेक्षा खीळ घालण्याचे उद्योग केले. मधल्या अडीच वर्षांत सुद्धा तेच झाले. योजना येत्या चार महिन्यांत पूर्ण होईल आणि प्लॅनिंग करत संपूर्ण शहराला पाणी देऊ…इतकी वर्षे मृगजळ होतं आता नाही. टप्प्यात आलीय योजना. मी काळजी घेईन ती योजना अंतर्गत जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या याची पूर्तता लवकरात लवकर करणार. प्रश्न : राज्यात लाडक्या बहिणींसाठी तुम्ही योजना आणली तसं मनपासंदर्भात काही संकल्प आहेत का? शिंदे : हो नक्कीच! शिवसेनाप्रमुख कायम आपल्या भाषणाची सुरुवात माता-भगिनींनो म्हणून करायचे. तोच माझाही स्वभाव आहे. माझ्या राज्यातील माता-भगिनींना समाधानी बघणं ही माझी भावना. म्हणून तर मी लाडकी बहीण योजना आणली. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जोमाने काम करणार आहे. यावेळी माझ्यासमोर माता भगिनी आणि युवक हे विकास कामाचे केंद्र राहणार आहेत. बहिणींना सक्षम करणं या उद्देशाने संकल्प आहेत. ते लवकरच दिसतील. माझ्या वचननाम्यामध्ये मी म्हटले त्याप्रमाणे महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणार, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रांना सुरुवात करतोय. मुख्य बाजारपेठ आणि सर्वच शहरात वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी, शहरात सगळ्या भागात सुनियोजित भाजीमंडई असेल. मुख्यतः वर्किंग वुमनचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काही ठोस उपक्रम हाती घेतले जातील. कारण ही संख्या भविष्यात वाढणार. शहर बस सेवेत त्यांना सवलत तर देऊतच पण विशेष महिला चालक – वाहक बस त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न असेल. महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून स्त्रीला कम्फर्ट वाटेल असे वातावरण देण्याचा प्रयत्न असेल. प्रश्न : वाहतूक समस्या वाढली यावर उपाय काय असावा? शिंदे : हे बघा ! या शहराचा आम्ही खूप बारकाईने अभ्यास केलाय. इथल्या नागरी प्रश्नांवर चर्चा झाल्या आहेत. ठोस वाहतूक धोरण आणि काळजीने रस्त्यांची कामे झाली तर हा प्रश्न सुटू शकतो. वाहतूक धोरण ठरवणं, त्याची अंमलबजावणी प्रभावी करणे गरजेचे आहे. सार्वजनिक पार्किंग तळांचा विचार आम्ही केला आहे. सोल्यूशन आहेत तुम्ही बघाल. आमच्या पदाधिकारी व आमदारांना सांगितलं की यावर तुमच्या स्तरावर काही मुद्दे द्या. मुद्दे आलेत आणि माझी यासाठीची टीम येऊन गेली. वाहतूक नियोजनात तुमचे उड्डाणपूल हा गंभीर विषय आहे. पण मार्ग काढू! अखंड उड्डाणपुलाची मागणी होतेय, त्यावर सर्वेक्षणअंती निर्णय घेऊ. व्यवहार्य असेल आणि नागरिकांना ज्यामुळे अडचण होणार नाही, असेच निर्णय होतील. प्रश्न : इतरही काही मुद्दे तुमच्या वचननाम्यात आहेत त्यापैकी तुम्हाला कोणता महत्त्वाचा वाटतो ? शिंदे : कोणता म्हणजे? अहो ! सगळे महत्त्वाचे आहेत म्हणून तर घेतले. शिवसेनेचा वचननामा आहे, माझा शब्द आहे. कमिटमेंट आहे आणि एकदा कमिटमेंट दिली की दिली.. मग आर या पार लढाई असते आमची. इथले पर्यावरण असो किंवा पर्यटन मी मागे हटणार नाही. “ ये बाज की नजर है’ प्रश्न : छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आपण आणखी कोणत्या विषयाला प्राधान्य देताय ? शिंदे : प्राधान्यक्रमाचा विचार करताना मला दिसते ते पर्यटन राजधानीचे भविष्यातील चित्र आणि सांस्कृतिक दृष्टीने संपन्न वारसा असलेल्या या ऐतिहसिक शहराच्या संस्कृतीचे – वारशाची जपणूक. हा एकनाथ वारसा जपण्यात कमी नाही, जिथे चांगले आहे ते राखून ठेवले पाहिजे. कोत्या मनोवृत्तीने कधी काम करत नाही, देताना हातचे राखत नाही आणि म्हणून पर्यटनवाढीसाठी मुबलक योजना आहेत. महानगरपालिकेच्या पर्यटन विभागाला अद्ययावत सक्षम करण्याला प्राधान्य दिले जाईल. कारण ही पर्यटनाची राजधानी आहे आणि अजिंठा-वेरूळसह शहरातील पर्यटनाला येणाऱ्या जनतेला सुविधा देणे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पहिले कर्तव्य. त्यामुळे टुरिस्ट बस सेवा असेल किंवा मागर्दर्शन केंद्र असेल, ही सोय करणे इथले दरवाजे, अनेक ऐतिहासिक स्थळांची दुरुस्ती हा माझ्यासाठी गंभीरपणे बघण्याचा विषय राहील. सांस्कृतिक दृष्टी म्हणालो तेव्हा माझ्या डोक्यात आलं ते हे की, कोणत्याही शहराची ओळख होते ती तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी नव्याने शहरात येणाऱ्यांना दिसले पाहिजे काही चांगले घडत आहे. मनपाच्या वतीने नियमित उपक्रम राबवले जातील. शहरातील नाट्यगृहांसाठी अनुदान विषय असेल किंवा गरज भासल्यास नवीन नाट्यगृह असेल या सगळ्यांना प्राधान्य देऊ. प्रश्न : छत्रपती संभाजीनगरबाबत आपलं वचन सांगतायं, या वचनाला जनता कसा प्रतिसाद देणार ते लवकरच कळेल. शेवटी एकच मोठा भाऊ होण्याची तुमची इच्छा आहे का…? शिंदे : एक सांगू का? लोकांना कोण मोठा कोण छोटा भाऊ यात इंटरेस्ट नसतो. यापेक्षा कोण दिखाऊ आणि कोण रोडवर उतरून काम करू शकतो हे जनता बघेल, कोण खऱ्या भावाच्या मायेने उपयोगी आहे हे जनतेला कळतं, माझ्या लाडक्या बहिणींना माहिती आहे कोणता भाऊ कामाचा आहे. यंदा एक दिवस आधी संक्रांतीचे वाण लुटले जाणार आहे, दुसऱ्या दिवशी मतदान आहे. माता भगिनींना आपल्या माध्यमातून एकच विनंती करेन, हा सच्चा लाडका भाऊ तुमच्यापर्यंत आलाय तो तुमच्या शहराला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी, तुम्हाला सुविधा देण्यासाठी आणि सुखद शहर कसं असतं हे सिद्ध करून दाखवण्यासाठी ! माझा धनुष्यबाण या शहरासाठी प्रगतीचं वाण घेऊन आलाय. जो विश्वास छत्रपती संभाजीनगरने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत टाकला तोच विश्वास आताही आहे… राहणार! जय महाराष्ट्र!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *