![]()
महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय पक्षांचे प्रचार सुरू झाले आहेत. मतदानासाठी जनजागृती देखील केली जात आहे. परंतु, मुंबईच्या जुहू भागातील सुमारे 35 हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे
.
मुंबईच्या जुहू परिसरातील जवळपास 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याच्या आशयाचे बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
जुहू परिसरात असलेल्या मिलिटरी रडारमुळे नागरिकांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या 35 वर्षांपासून इथल्या 200 धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्टी विकासकापासून रखडल्या आहेत. या इमारतींचे पुनर्विकास होऊ शकत नसल्याने जवळपास 35 हजार लोक धोकादायक इमारतींमध्ये भीतीच्या सावटाखाली राहतात असा दावा करण्यात आला आहे. येथील नागरिकांनी त्यांच्या समस्या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागासमोर मांडल्या. अनेकदा त्याचा पाठपुरावा करूनही यश आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
बॅनरवर काय म्हटले आहे?
जुहू परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकताना सर्वत्र बॅनर लावले आहेत. यावर असे लिहिले आहे की, एसआरओ 150 कायदा कालबाह्य आहे आणि त्यामुळे घरे उद्ध्वस्त होत आहेत. 1939 च्या ब्रिटिश कायद्यांतर्गत आम्हाला आमच्या कायदेशीर घरांमधून हाकलण्यात आले आहे. सुमारे 200 इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्या धोक्यात असून इथल्या 35 हजार नागरिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा आणि पुन्हा विचार करा. यापुढे खोटी आश्वासने आता चालणार नाहीत.
लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी त्यांच्या प्रश्नावर निवडणुकीनंतर तोडगा काढणार असे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर कोणताहीह नेता मदत करत नसल्याचे सांगत येथील नागरिकांनी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
ठाकरे बंधूंची भेट घालून तोडगा काढण्याचे आश्वासन
जुहूच्या रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात मतदानावर बहिष्कार टाकल्याचे अनेक बॅनर दिसून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 68 मधील मनसेचे उमेदवार संदेश सरदेसाई यांनी येथील नागरिकांची भेट घेतली. तसेच निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून, या प्रश्नाचा पाठपुरावा करू आणि योग्य तोडगा काढू, असे आश्वासन देण्यात आले आहे.
