Hingoli Vasmat Bank Employee Robbery Case; Rs 20 Lakh Seized Six Accused Hel | बँक कर्मचारी लुटीचा २२ तासांत छडा: रोख रकमेसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांनी १६०० किमी प्रवास करून ठोकल्या आरोपींना बेड्या – Maharashtra News



वसमत तालुक्यातील कोर्टाफाटा शिवारात बँक कर्मचाऱ्याला लुटल्या प्रकरणात आंध्रप्रदेशातून ताब्यात घेतलेल्या सहा आरोपींकडून पळविलेल्या ६.७० लाख रुपयांसह २० लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व कुरुंदा पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणात

.

वसमत तालुक्यातील कोर्टा शिवारात चोंढी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी ज्ञानेश्‍वर भोसले यांना वाहनाची धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ८ लाख रुपयांची रक्कम पळविली होती. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ९ गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, रामदास निरदोडे यांचे पथक तयार केले होते. या पथकाने या गुन्हयातील तीन आरोपींना यापुर्वीच अटक केली आहे. त्यानंतर त्या आरोपींच्या चौकशीमध्ये आणखी सहा जणांचा यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला होता.

पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासल्यानंतर सहा जण आंध्रप्रदेशात पळाल्याची माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे, उपनिरीक्षक पंढरी गंधकवाड, उपनिरीक्षक कारामुंगे, जमादार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, भगीरथ सवंडकर, संदीप टाक, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने बापटला रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकून महेंद्र कांबळे, बालाजी पानधोंडे, ओमकार गव्हाणे, बालाजी डाखोरे, नागेश खराटे यांच्यासह एकास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांचाकडून पळविलेल्या ८ लाख रुपयांच्या रकमेपैकी ६.७० लाख रुपये तसेच गुन्हयासाठी वापरलेली वाहने असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग आहे काय याची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर गुन्हा दाखल होऊन तीन दिवसांत सर्व गुन्हा उघडकीस आणल्या बद्दल पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी पोलिस पथकाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *