![]()
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांच्या बूथवर कार्यकर्त्यांची नियोजनबद्ध कामे सुरू असतानाच, डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपने सर्वाधिक जागा बिनव
.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी चक्क रोख पैशांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. डोंबिवलीच्या तुकाराम नगरमधील दशरथ भुवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून नागरिकांच्या घरी पांढऱ्या रंगाची पाकिटे पोहोचवली जात होती. या प्रत्येक पाकिटात ५०० रुपयांच्या सहा नोटा, म्हणजे ३ हजार रुपये असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या दक्ष कार्यकर्त्यांनी या पैसे वाटपाचा छडा लावत संबंधितांना रंगेहाथ पकडले. या घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाचे भरारी पथक आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
महायुतीमधील ‘मैत्रीपूर्ण’ लढत ठरतेय संघर्षाची
डोंबिवलीतील या विशिष्ट प्रभागात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात ‘मैत्रीपूर्ण’ लढत होत आहे. भाजपचे उमेदवार विशू पेडणेकर आणि शिवसेनेचे नितीन पाटील यांच्यात येथे थेट सामना आहे. महायुती म्हणून एकत्र असणारे हे दोन्ही पक्ष या ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने मोठी रसाखेच पाहायला मिळत आहे. विशू पेडणेकर यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचे समोर आल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याचे व्हिडिओ बनवून हा डाव उधळला. महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्षच अशा प्रकारे समोरासमोर आल्याने आणि त्यातही पैसे वाटपाचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
बिनविरोध विजयाचा विक्रम करणाऱ्या भाजपची नाचक्की?
कल्याण-डोंबिवलीत भाजपने यापूर्वीच अनेक जागा बिनविरोध जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीतही एका जागेसाठी उमेदवाराला पैशांचे वाटप करावे लागते, यावरून भाजपच्या स्थानिक गोटात अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. बिनविरोध विजयाचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पक्षातच अशा प्रकारे ‘पाकीट संस्कृती’ फोफावल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर आता संबंधित उमेदवारावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण डोंबिवलीचे लक्ष लागले आहे.
