Gajanan Wari gave the message of unity, Palkhi procession filled with devotion set off from Jasapur to Shrikshetra Shegaon | गजानन वारीतून दिला एकात्मतेचा संदेश: जसापूर येथून श्रीक्षेत्र शेगावकडे निघाली भक्तिभावाने ओतप्रोत पालखी पायदळ वारी – Amravati News


.

जसापूरवासीयांनी गजानन माऊली वारी पालखी सोहळ्यातून एकात्मतेचा संदेश दिला असून संपूर्ण गावामध्ये सडा-सारवण, रांगोळ्यांतून श्रद्धा उमटली असल्याचे दिसून आले. गाव गाड्याच्या संस्कृतीचे जतन करून जाती–धर्माच्या पलीकडे भक्ती पोहोचली आहे.

श्री. संत भैय्याजी महाराज जसापूर (भडांगे) ते श्रीक्षेत्र शेगावकडे या पवित्र पालखी पायदळ वारी भक्तिभावपूर्ण वातावरणात बुधवारी ही दिंडी मोठ्या उत्साहात शेगावकडे रवाना झाली. रामकृष्ण महाराज अकोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व धनेश महाराज ढोके, प्रदीप रोडे महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. ही दिंडी ११ जानेवारी रोजी श्री. क्षेत्र शेगाव येथे पोहोचणार असून तेथे पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात येणार आहे.

वारीच्या प्रारंभी गावातील मंदिरामध्ये पालखीची विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या, सडा-सारवण करून पाणी शिंपण्यात आले. जय गजानन माऊलीच्या जयघोषात दिंडीतील भाविक पावल्या खेळत पुढे सरकत होते. प्रत्येक घरासमोर पालखीचे पूजन करण्यात येत होते. हे भक्तीमय दृश्य पाहून संपूर्ण गाव अक्षरशः माऊलीच्या गजरात न्हाऊन निघाले. जसापूर (भडांगे) वासीयांनी या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून भक्तीचा जागर करत गजानन महाराजांवरील आपली अपार श्रद्धा व्यक्त केली. भक्ती, एकता आणि संस्कारांचा संगम असलेला हा पालखी सोहळा परिसरात भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या पालखी सोहळ्यात सेवाधारी आशिष काळे, विणेकरी प्रतीक महाराज भडांगे, गायनाचार्य विठोबा पांडे, पवन काढणे, विनोद भडांगे, ज्ञानेश्वरी पाटेकर, ह.भ.प. विजया रोडे, मृदंगाचार्य गजानन भारसाकडे, जय पाटेकर, गोकुळ राऊत, विलास भडांगे, ऋषिकेश मेहरे, मधुकर मेहरे, प्रवीण नागे, सुनील भडांगे, अल्पेश, सोहम राऊत यांच्यासह जसापूर (भडांगे), नायगाव, भांबोरा, आराळा आदी गावांतील असंख्य गजानन भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

जाती, धर्माच्या पलीकडे भक्ती गेल्या सात वर्षांपासून जसापूर (भडांगे) गावातून शेगावकडे ही पायदळ वारी अखंडपणे निघत असून या वारीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती-धर्मातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून जसापूरवासीयांनी धर्मसहिष्णुता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. धर्मसहिष्णुतेचा संदेश देणारी जसापूर (भडांगे) ते शेगाव पालखी पायदळ वारी जाती–धर्माच्या पलीकडे भक्तीमय वातावरणात रवाना झाली असून सात वर्षांची भक्तीची परंपरा जोपासली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *