![]()
परभणी शहर मी दत्तक घ्यायला तयार आहे, पण महापालिकेत राष्ट्रवादीच्या घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच माझ्या विचारांची महानगरपालिका निवडून दया. सर्व स्तराचा विकास करायचे काम माझे
.
परभणीत प्रचार सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, परभणीचा जसा पाहिजे तसा विकास दुर्दैवाने झाला नाही. सर्व धर्मातील उमेदवार मग नवीन असो की जुने देण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतो. पिंपरी चिंचवडचा विकास कसा केला हे विचारा, असे अजित पवार म्हणाले.
इथल्या विकासाचा पाठपुरावा करणार
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, केंद्राचा आणि राज्याचा निधी कसा आणायचा याची सांगड घालावी लागते. परभणीत पिण्याच्या पाण्याची योजना, भूमिगत गटार योजना हातात घेतली आहे. सर्व रस्ते चांगले करू. सर्व जाती धर्मातील नागरिकांना सुविधा देऊ. जाती पातीचा, नात्याचा उमेदवार आहे म्हणून बघू नका, विकास कोण करेल हे बघा. उपमुख्यमंत्री म्हणून मी शब्द देतो की इथल्या विकासाचा पाठपुरावा मी स्वतः करणार, असे आश्वासन देखील पवारांनी यावेळी दिले.
परभणीला धूळमुक्त आणि खड्डेमुक्त करणार
परभणी धूळ आणि खड्ड्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मी धुळमुक्त, खड्डेमुक्त शहर करण्यासाठी पुढाकार घेतो. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असेल तिथे कॅन्सरचे रुग्णालय उभे करणार. राज्याचा केंद्राचा निधी आणू, जसे पिंपरी चिंचवड, बारामती केले तसेच परभणी करू, असे आश्वासन अजित पवारांनी दिले. इथली एमआयडीसी बंद आहे ती चालू करू, तसेच उद्योगपती पाणी, जमीन, लाईट आणि रस्ते आहेत का नाही ते पाहत असतात, असेही पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पहिले जकात मिळत होता, पुन्हा एलबीटी मिळत होता, त्यात सर्व होत होते. मात्र, आता जीएसटी मिळतोय, पण त्यात आमचे भागत नाही. आम्हाला जेवढा पैसा पाहिजे तेवढा मिळत नाही. सगळी काम करता येतात, पण पैशांचे सोंग करता येत नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा पाहिजे असतात, मी त्या 100 टक्के परभणीला देणार.
महानगरपालिकेची इमारत अद्ययावत बांधू
माझे अनेक उद्योगपती मित्र आहेत. मध्यंतरी बारामतीला गौतम अदानी आले होते. त्यांनाही मी बोलू शकतो. 35 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक महत्त्वाच्या विकास कामांना निधीही दिला. परभणी महानगरपालिकेची इमारत अद्ययावत बांधू. महापालिकेत सरकारने मान्यता दिली तर भरती करू. परभणीकरांना हेवा वाटेल असे क्रीडा संकुल तयार करून देईल, क्रीडा खाते माझ्याकडेच असल्याचेही पवारांनी सांगितले.
परभणीतील सय्यद शाह तुराबुल हक्क दर्गाह,परदेश्वर मंदिर परिसर याचा विकास आराखडा तयार करून निधी देवू. परभणी शहर दत्तक घ्यायला तयार पण महापालिकेत राष्ट्रवादीचे घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी केले.
