देशव्यापी व्यक्तिमत्त्वांपासून प्रेरणा घेऊन यशस्वी व्हा:सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन‎




कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवला. शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे हे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने देशव्यापी होते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे संस्थापक कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त शेवगाव येथील आबासाहेब काकडे विद्यालयात आयोजित सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आबासाहेबांचा हा जनहिताचा विचार आणि शैक्षणिक वारसा त्यांचे चिरंजीव ॲड. डॉ. विद्याधर काकडे व स्नुषा हर्षदा काकडे मोठ्या नेटाने पुढे चालवत असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. भापकर म्हणाले, मी या शैक्षणिक समूहाचा माजी शिक्षक असल्याचा मला अत्यंत अभिमान आहे. आबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच मला शासकीय सेवेत समाजोपयोगी कार्ये करता आली. आजच्या विद्यार्थ्यांनी आबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाचन करून स्वतःमधील क्षमता ओळखाव्यात.या वेळी ज्येष्ठ नेते शेषराव देशपांडे यांनी आबासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत शाळा व वसतिगृहे सुरू करून ती यशस्वीपणे चालवली. ‘कर्म हीच पूजा’ मानून त्यांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले, अशा शब्दांत त्यांनी कार्याचा गौरव केला. व्यासपीठावर समूहाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विद्याधर काकडे, विश्वस्त हर्षदा काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्राचार्य डॉ. लक्ष्मण बिटाळ, उपप्राचार्य अशोक तमनर उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून सैन्य दलातील राजपत्रित अधिकारी नवनाथ काटे, डॉ. सुरेश पाटेकर, डॉ. भागिनाथ काटे, जगन्नाथ गावडे, सुमन गावडे, लक्ष्मण गवळी, विजय मुधोळकर आदी उपस्थित होते. या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयात पुढील १५ दिवसांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. लक्ष्मण बिटाळ यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. जरीना शेख यांनी केले, तर आभार मानल्यानंतर ‘वंदे मातरम’ने सोहळ्याची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *