.

श्रावण महिना सुरू होताच येथील साडेआठशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले श्री खंडेश्वर (महादेव) मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग या ठिकाणी लागत असून, महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.
नांदगाव खंडेश्वरसह अमरावती जिल्हा, विदर्भातील विविध भाग तसेच मध्य प्रदेशातूनही याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. अमरावतीपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव खंडेश्वर गावाच्या मध्यभागी हे पुरातन मंदिर उंच टेकडीवर वसले आहे. दगडी पायऱ्या चढून मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर काळ्या दगडांची तटबंदी आणि त्यामागे असलेले देखणे हेमाडपंथी मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील शिवपिंड असून, उत्तर दिशेला शिव-पार्वतीचे तर दक्षिण दिशेला भगवान नरसिंहाचे मंदिर आहे. तिन्ही मंदिरांसाठी एकच प्रशस्त सभामंडप असून, समोर आकर्षक नंदी विराजमान आहे. मंदिर परिसरातील सुमारे १०० फूट उंच दीपमाळही भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. श्रावणी सोमवारी महादेवाला जलाभिषेक, बेलपत्र व फुलांची पूजा करून भाविक दर्शन घेत आहेत. पहाटेपासून सुरू होणारी पूजा-अर्चा आणि सायंकाळची आरती यामुळे दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे. स्थानिक श्रद्धेनुसार श्रावणी सोमवारी कोंडेश्वर, खंडेश्वर आणि बोंडेश्वर या तिन्ही देवांचे दर्शन घेतल्यास काशीला गेल्याचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खंडेश्वराच्या दर्शनासाठी विदर्भासह मध्य प्रदेशातील भाविकही मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.दुसरीकडे साडेआठशे वर्षांचा इतिहास अंगावर बाळगून उभे असलेले श्री खंडेश्वर मंदिर आजही नांदगाव खंडेश्वरची ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपत आहे. श्रावण महिन्यातील भाविकांची वाढती गर्दी पाहता या पुरातन मंदिराचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. प्राचीन काळात बांधलेले हेमाडपंथी श्री खंडेश्वर मंदिर. (दुसऱ्या छायाचित्रात) मंदिरातील शिवपिंड
मंदिराच्या शिलालेखानुसार मंदिराला सुमारे ८५० वर्षांचा इतिहास असून, शके ११७७ अर्थात इ.स. १२५५ च्या सुमारास देवगिरीचे राजे रामदेवराय यांचे पंतप्रधान हेमाद्रीपंत यांनी मंदिराचे बांधकाम केले, असा उल्लेख आढळतो. मंदिरात दगडी खांबांवरील राजपरिवार, राजनर्तकी, शिव-पार्वती, देवतांच्या अप्रतिम कोरीव मूर्ती प्राचीन स्थापत्यकलेची साक्ष देतात.
