पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणीचा 'खणखणाट आणि घुंगरांचा छनछनाट':बालगंधर्व रंगमंदिरात 25 कलावंतांनी ठसकेबाज अदाकारीने प्रेक्षकांना जिंकले

[ads1]


३८ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणीचा ‘खणखणाट आणि घुंगरांचा छनछनाट’ हा बहारदार कार्यक्रम सोमवारी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. दिलखेचक अदाकारी, ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावले आणि ठसकेबाज लावण्यांनी सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या कार्यक्रमात २५ लावणी कलावंतांनी आपली कला सादर केली. यात गोल्डन गर्ल नमिता पाटील, लावणी क्वीन अर्चना जावळेकर, लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, नृत्यअप्सरा प्राची मुंबईकर, नृत्यांगना किरण पुणेकर, अस्मिता पुणेकर, नेहा मुंबईकर, पूजा बिडकर आणि संगीता लाखे यांचा समावेश होता. गायिका स्वाती शिंदे यांच्या ठसकेबाज आवाजातील लावण्यांना प्रेक्षकांनी ‘वन्स मोर’ दिला. ढोलकीवर संदीप मस्के आणि आशिष गायकवाड, कीबोर्डवर अक्षय सकट, पॅड रिदमवर सुशांत मस्के, गायक स्वप्निल गायकवाड आणि निवेदक सोमनाथ फड यांनी साथ दिली. कार्यक्रमाला पुरुष आणि महिलांची मोठी गर्दी झाली होती. गण, गवळण, मुजरा, पारंपरिक आणि नवीन लावण्यांना प्रेक्षकांनी शिट्या आणि टाळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे सभागृहातील वातावरण अधिकच रंगतदार बनले. यावेळी ‘विचार काय हाय तुमचा’, ‘नाकी डोळी छान’, ‘राजस भेटला पैलवान’, ‘प्रीतीच्या झुल्यात झुलवा’, ‘लोणावळा खंडाळा’, ‘बाई ग कसं करमत नाही’, ‘चंद्रा’, ‘हिऱ्याची अंगठी’, ‘कैरी पाडाची’, ‘इश्काचा बाण सुटला’, ‘ह्या नटीन मारली मिठी’ आणि ‘तुम्हावर केली मर्जी बहाल’ अशा एकापेक्षा एक सरस लावण्या सादर झाल्या. यातील अनेक लावण्यांना प्रेक्षकांनी पुन्हा सादर करण्याची मागणी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विश्वस्त मोहन टिल्लू, बालगंधर्वचे समन्वयक श्रीकांत कांबळे आणि अतुल गोंजारी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. ठसकेबाज लावण्या, नृत्यांगनांची अदाकारी आणि वाद्यवृंदाची उत्तम साथ यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात अविस्मरणीय ठरला.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *