[ads1]
![]()
केवळ मोठ्या आणि सुंदर इमारती उभ्या राहिल्याने शहराचा पूर्ण विकास होत नाही. शहराच्या विकासासोबतच कला, संस्कृती आणि परंपरा जपण्याचीही गरज आहे. आपल्या संस्कृतीचे मूळ सोडून विकास साधता येणार नाही. परदेशी संस्कृती आणि वेशभूषेचे अनुकरण करण्याऐवजी भारतीय संस्कृती जपण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. ३८व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी स्वारगेट येथील श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षा मीरा कलमाडी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि डॉ. सतीश देसाई उपस्थित होते. राधाकृष्णन म्हणाले की, गणेश हा प्रथम पूजनीय देव आहे. त्यांच्या स्मरणाने शुभ कार्याची सुरुवात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना किल्ल्यांचे जतन केले. तंजावरमध्येही त्यांनी तमिळ साहित्य जपण्यासाठी योगदान दिले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून देशात मोठे आंदोलन उभे केले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला उत्तम संविधान दिले. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील पुणे कराराचाही त्यांनी उल्लेख केला. पुणे हे विद्येचे माहेरघर असून देशातील महत्त्वाच्या लष्करी संस्था येथे आहेत. सिम्बायोसिस विद्यापीठातील विविध देशांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम हे विविधतेतील एकतेचे उदाहरण आहे. भाषा, जात, धर्म, रंग आणि खाद्यसंस्कृती वेगवेगळी असली तरी भारतीय संस्कृती आपल्याला एकत्र आणते. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून देशातील विविध कला आणि संस्कृती एकाच व्यासपीठावर येतात. कलाकारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीही या महोत्सवाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुढील वर्षी पुणे फेस्टिव्हलमध्ये मराठीतून भाषण करण्याची इच्छा व्यक्त केली. मराठी शिकण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक करून समाजात मोठे आंदोलन उभे केले. आयटी, वाहन उद्योग, शिक्षण आणि संस्कृतीमुळे पुण्याला देशात वेगळे स्थान मिळाले आहे. विविधतेला कलेच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम पुणे फेस्टिव्हलने केले आहे, असे ते म्हणाले.
[ads2]
मोठ्या इमारतींनी नव्हे, कला-संस्कृतीच्या जतनाने शहराचा विकास- उपराष्ट्रपती:38व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन; मोहन जोशींना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
















Leave a Reply