शेंदुरजनाघाट | अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने कालव्याद्वारे सोडले जाणारे पाणी बंद करावे, अशी मागणी वरुड परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मोर्शी-वरुडचे आमदार चंदूभाऊ यावलकर यांची भेट घेतली. शेतकरी प्रतिनिधीमंडळाच्या म्हणण्यानुसार, अल नीनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाळ्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणात सध्या ४० टक्के पाणी शिल्लक असून बॅकवॉटरची पातळीही घटत आहे. लोणी, भापकी, पळसवाडा, बेलोरा, इत्तमगाव, अलोडा, शिंगोरी, ममदापूर आणि हातुर्णा या गावांतील शेती बॅकवॉटरवर अवलंबून आहे. या भागातील शेतकऱ्यांची जमीन अप्पर वर्धा धरणासाठी संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्यावर पहिला हक्क परिसरातील शेतकऱ्यांचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कालव्याद्वारे पाणी सोडत राहिल्यास बॅकवॉटर संपेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या शेतात संत्रा, मोसंबी आणि इतर पिके आहेत. पुढे पाणी न मिळाल्यास पिके वाळतील आणि जनावरांसाठीही पाणी उरणार नाही, असे त्यांनी सांगितले. कालव्याचे पाणी तात्काळ बंद करावे, अशी मागणी तुषार निकम, प्रवीण मानकर, अजय काचरे, चंद्रशेखर पावडे, अशोक ताथोडे, स्वप्नील खांडेकर, सतीश चौधरी, राजेंद्र ताथोडे, अरुण पावडे, मधुकर मनोटे, कैलास वानखडे, राजेंद्र शहाणे, विलास सोनारे, निकेश ताथोडे, धनराज चौधरी, मंथन पावडे, सतीश ताथोडे, जगदीश पाटणे, गणेश उईके, राजेश पावडे, शुभम पावडे आणि आशिष पावडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली. सध्या अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. अशा वेळी मिळणारे पाणी थांबवण्याची मागणी झाल्याने कालव्याचे पाणी बंद होणार की सुरू राहणार, याकडे लक्ष लागले आहे. अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा २५ ऑक्टोबरला ४६.३५ टक्के होता. मंगळवार, ३ नोव्हेंबरला तो ४२.६८ टक्क्यांवर आला. आठ दिवसांत पाणीसाठ्यात सुमारे ४ टक्क्यांची घट झाली.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search