![]()
राज्यात महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. मात्र, मालेगाव महापालिका प्रशासनाने चक्क एका मृत व्यक्तीला निवडणूक कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शिक्षक संतोष बोरसे
.
मयत संतोष बोरसे यांच्या नावे नियुक्तीचे अधिकृत आदेश धडकल्यानंतर नांदगाव तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. जे शिक्षक या जगातच नाहीत, त्यांना हा शासकीय आदेश कोठे आणि कसा बजावायचा? असा ‘यक्षप्रश्न’ कर्मचाऱ्यांना पडला आहे. प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे मयत शिक्षकाच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळले गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून ‘दोषारोप’ आणि नोटिसांचा धडाका
हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी तातडीने सावरासावर सुरू केली आहे. महापालिका प्रशासनाने या सर्व गोंधळाचे खापर नांदगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागावर फोडले आहे. शिक्षण विभागाने कर्मचाऱ्यांची अद्ययावत माहिती न पुरवल्यामुळेच ही चूक घडल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणी आयुक्तांनी कठोर पाऊल उचलत संबंधित शिक्षणाधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. कर्तव्यात कसूर करणे आणि प्रशासनाला चुकीची माहिती पुरवल्याचा ठपका ठेवत, येत्या २४ तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कठोर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
प्रशासकीय ‘डेटा’ अपडेट कधी होणार?
निवडणुकीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामात अशा प्रकारच्या चुका होणे, हे प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेचे लक्षण मानले जात आहे. मृत व्यक्तीची ड्युटी लावण्यापर्यंत मजल जाते, याचाच अर्थ कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासन गंभीर नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आता या 2-4 नोटिशीनंतर तरी प्रशासकीय दप्तर सुधारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
