![]()
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना, सत्ताधारी महायुतीने जागावाटपाचा मोठा टप्पा पार केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मुंबईतील 207 जागांवर एकमत झाले असून, यात भाजप 128 तर शिव
.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रंगशारदा येथे प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जागावाटपाची आकडेवारी स्पष्ट केली. उर्वरित 20 जागांबाबत बोलताना साटम म्हणाले की, या जागांवर तोडगा काढताना ‘समोरचा उमेदवार कोण’ याचा विचार केला जाईल. विरोधकांच्या प्रबळ उमेदवाराचा विचार करून त्या जागी भाजपचा उमेदवार द्यायचा की शिवसेनेचा, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. गरज पडल्यास दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारांची अदलाबदल करण्याची तयारीही महायुतीने ठेवली आहे. केवळ संख्याबळापेक्षा ‘इलेक्टिव्ह मेरिट’ (निवडून येण्याची क्षमता) यालाच प्राधान्य दिले जात असल्याचे अमित साटम यांनी स्पष्ट केले.
मित्रपक्षांना समाधानकारक जागा
मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या शक्तींना परास्त करण्यासाठी आमची महायुती तयार आहे, सर्व मित्र पक्षांना समाधानकारक जागा देण्यात येतील. कोण किती जागा लढणार हे महत्वाचे नाही, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन यादी जाहीर करू असेही अमित साटम यांनी म्हटले. दुसरे लोक काय करतात यावर आमचे निर्णय ठरतील, असेही अमित साटम यांनी सांगितले.
उद्धव-आदित्य ठाकरेंवर टीका
यावेळी अमित साटम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली असून, ते आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान देत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. आदित्य ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी ‘बालबुद्धी’ असा करत, “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांनी आम्हाला प्रभू रामचंद्र शिकवू नयेत,” असा टोलाही लगावला.
गरज पडल्यास उमेदवारांची अदलाबदली
महायुती कशी जिंकणार याच नियोजन करत आहे, आम्ही उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करत आहोत. आम्हाला उमेदवारांची अदलाबदली करायची असेल तर तीही करू, दोन्ही पक्षाचं सन्माजनक जागा वाटप होईल. मुंबईत महायुतीने 150 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, जागा व पक्ष बाजुला ठेवत आहोत. एकमेकांना विश्वासात घेऊन प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल यावर फोकस आहे. उमेदवार कुठला जिंकेल हा निकष आहे, संख्याबळ दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे नाही, गरज असेल तिथे उमेदवारांची अदलाबदल केली जाईल, असे शिवसेना सरचिटणीस तथा खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले.
रिपाइंची 17 जागांची मागणी
जागावाटपाच्या या प्रक्रियेत मित्रपक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेने महायुतीकडे 17 जागांची मागणी केली आहे. यात सायन, धारावी, चेंबूर आणि कुर्ला यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. मित्रपक्षांच्या या मागणीवर शिंदे यांच्या शिवसेनेकडून सकारात्मक विचार केला जात आहे.
महायुतीची पहिली यादी लवकरच
निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका 1 किंवा 2 जानेवारीपासून सुरू होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त जाहीर सभांचे नियोजन करण्यात आले आहे. 20 जागांचा अंतिम निर्णय होताच आज रात्री किंवा उद्यापर्यंत महायुतीची पहिली अधिकृत उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
20 जागांबाबत एकनाथ शिंदेंशी चर्चा
दरम्यान, महायुतीच्या नेत्यांची रंगशारदा येथील बैठक संपून आता शिवसेना आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर पुढील चर्चेसाठी निघाले आहेत. उरलेल्या 20 जागांच्या संदर्भात आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा होणार आहे. मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले आहेत.
