![]()
भाजपने मुंबई महापालिकेचा गड जिंकण्यासाठी उत्तर भारतीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हिंदी भाषिक स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्
.
सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा घोळ आता जवळपास संपल्यात जमा आहे. भाजप व शिवसेना ही निवडणूक एकत्रपणे लढणार आहेत. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर या निवडणुकांना सामोरा जाणार आहे. भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी आकाश – पाताळ एक करत आहे. यासाठी या भगव्या पक्षाकडून वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात आहेत. यात उत्तर भारतीय मतदारांना पक्षाकडे खेचण्यासाठी त्यांच्याच भागातील स्टार प्रचारकांना प्रचारासाठी बोलावण्याच्या रणनीतीचाही समावेश आहे.
कुणाकुणाला प्रचाराच्या मैदानात उतरवणार?
यासंबंधीच्या माहितीनुसार, भाजपने उत्तर भारतीयांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरुहुआ व रवी किशन यांना प्रचारासाठी बोलावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मतांचे समीकरण पाहता उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डांमध्ये भाजपकडून या प्रचारकांना मैदानात उतरवण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत या स्टार प्रचारकांची मांदियाळी मुंबईच्या हिंदी भाषिक बहुल भागात दिसून येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेनेही या कामी अभिनेता गोविंदा यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
जागांच्या अदलाबदलीवर चर्चा
दुसरीकडे, भाजप व शिवसेनेच्या समन्वय समितीची सध्या चर्चा सुरू आहे. त्यात जागांची अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण व प्रचाराच्या स्ट्रॅटजीवर चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोन्ही पक्ष 10-12 जागांवरील उमेदवारांची अदलाबदल करण्याच्या मुद्यावर संवाद साधत आहेत. यापैकी काही जागांवर दोन्ही पक्ष अडून बसलेत. त्यामुळे त्यावर विचारपूर्वक तोडगा काढला जात आहे. मुंबई महापालिकेत महायुतीचाच उमेदवार बसवण्याचा निर्धार शिवसेना व भाजपने केला आहे. त्यामुळे जागांच्या अदलाबदलीच्या प्रक्रियेत कोणताही अडसर येणार नाही याची काळजी दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे.
मुंबईत निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ
एका वृत्तानुसार भाजप मुंबईत 140, तर शिंदे गट 87 जागांवर लढणार असल्याची माहिती आहे. यामुळे या दोन्ही पक्षांत भाजप मोठा भाऊ राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 3 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आज रात्री उशिरा किंवा उद्यापासून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे. पण सर्वांनी आपापल्या पात्र उमेदवारांना यापूर्वीच कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
