Moneylender seizes flat for interest | सावकाराने व्याजासाठी फ्लॅटवर मारला ताबा: वारजे माळवाडी येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News



व्याजाचे पैसे वेळेवर देऊनही आणखी आठ लाख रुपयांची मागणी करत, ती रक्कम न दिल्याने थेट फ्लॅटवर ताबा मारणाऱ्या सावकारासह एका महिलेविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरभी हाइट्स, वारजे येथील ए

.

विशाल लंकेश्वर (रा. वारजे, पुणे) आणि मधुमती रंगदाळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सम्राट सुधीर सुपेकर (वय ३६, रा. तिरुपतीनगर, वारजे, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुनील जगदाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तक्रारदार सम्राट सुपेकर यांचे नळ स्टॉप परिसरात ‘सूर्या स्नॅक्स’ नावाचे हॉटेल आहे. तसेच, त्यांनी २०१७ मध्ये सुरभी हाइट्स, वारजे येथील ए विंगमधील फ्लॅट क्रमांक ७ खरेदी केला होता. २०१७ ते २०२४ या कालावधीत त्यांनी कर्वेनगर येथे ‘पुरंदरे स्नॅक्स अ‍ॅण्ड भोजनालय’ नावाचा हॉटेल व्यवसायही चालविला होता.

हॉटेल व्यवसायाच्या विस्तारासाठी सुपेकर यांना पैशांची गरज होती. याच दरम्यान त्यांची ओळख विशाल लंकेश्वर आणि मधुमती रंगदाळे यांच्याशी झाली. आम्ही व्याजाने पैसे देतो, हा आमचा व्यवसाय आहे, असे सांगत त्यांनी ‘डेली कलेक्शन’ पद्धतीने पैसे देण्याचे आश्वासन दिले.

ऑक्टोबर २०२२ मध्ये लंकेश्वर याने सुपेकर यांना ९ हजार रुपये दिले. यासाठी दररोज २५० रुपये व्याज कलेक्शन ठरविण्यात आले होते. ही रक्कम मधुमती रंगदाळे यांच्या नावाने असलेल्या बेअरर चेकद्वारे देण्यात आली होती. पुढील ५० दिवसांत सुपेकर यांनी व्याजासह १२ हजार ५०० रुपये लंकेश्वर यांना परत केले.

यानंतर पुन्हा पैशांची गरज भासल्याने सुपेकर यांनी लंकेश्वरकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. डिसेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२४ या २० महिन्यांच्या कालावधीत लंकेश्वरच्या सांगण्यावरून सुपेकर यांनी सहकारी मधुमती रंगदाळे हिच्या मोबाईलवर ऑनलाईन स्वरूपात एकूण ४ लाख ८० हजार रुपये व्याजासह परत केले.

तरीही फेब्रुवारी २०२५ मध्ये लंकेश्वर याने पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. सर्व रक्कम दिल्याचे सुपेकर यांनी सांगितले असता, उर्वरित रक्कम न दिल्यास “तुला पाहून घेतो” अशी धमकी लंकेश्वरने दिली. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुपेकर हे पत्नीसमवेत सुरभी हाइट्समधील त्यांच्या फ्लॅटची साफसफाई करण्यासाठी गेले असता सायंकाळी लंकेश्वर आणि रंगदाळे तेथे आले. व्याजाचे पैसे मागत त्यांनी शिवीगाळ केली. पैसे न दिल्याने त्यांनी थेट फ्लॅटचा ताबा घेत सुपेकर दाम्पत्याला बाहेर काढले. “व्याजाचे पैसे मिळेपर्यंत फ्लॅट आमच्या ताब्यात राहील,” असे सांगत त्यांनी बेकायदेशीररित्या ताबा मिळविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *