![]()
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इगतपुरीजवळील बोरटेंभे परिसरात रस्ता खचून महामार्गाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसमोर अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून परिसरात चिंतेचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खड्ड्याभोवती तातडीने बॅरिकेड्स उभारण्यात आले असून वाहनचालकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा वर्दळीचा मार्ग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत रस्ता खचल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बोरटेंभेजवळ महामार्ग खचला; अपघाताचा धोका वाढला:इगतपुरी तालुक्यातील घटना;त्वरित दुरुस्तीची मागणी
