'ऑपरेशन तुडवा'ला सुरुवात!:नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे, ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून घोषणाबाजी




एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांना आपल्याकडे वळवत ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी केल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी या 6 मतदारसंघांचा दौरा करून शिवसैनिकांना ‘ऑपरेशन तुडवा’ राबवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून, फुटीर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मैदानावर आणि सोशल मीडियावरही विरोधाची धार तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व खासदार श्रीकांत शिंदे हे नांदेड दौऱ्यावर होते. यावेळी सारखनी या गावाकडे जात असताना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवल्याची घटना घडली आहे. सारखनी हे गाव हिंगोली लोकसभा क्षेत्रात येते. येथील खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात गेल्याने त्यांना काही ठिकाणी विरोध केला जात आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासह आष्टीकर देखील प्रवास करत होते. त्यांचा ताफा सारखनी गावातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतले आहे. श्रीकांत शिंदेंनी उमरखेडमध्ये संवाद मेळाव्यातून शिवसैनिकांशी संवाद साधला खासदार श्रीकांत शिंदे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे आयोजित ‘संवाद मेळाव्यात’ शिवसैनिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सज्ज करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच, प्रत्येक गावात पक्षाची शाखा स्थापन करणे, घरोघरी पक्षाची विचारधारा पोहोचवणे, नवीन शिवसैनिकांची नोंदणी करणे आणि बूथस्तरावरील संघटन अधिक मजबूत करणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह पक्षाचे इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले याच संवाद मेळाव्यात बोलताना खासदार शिंदे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला आणि रखडलेला ‘पीक विम्याचा’ प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले. मात्र, एका बाजूला पक्षाची बांधणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जात असतानाच, दुसरीकडे या मेळाव्यासाठी जात असताना नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आपला तीव्र विरोध दर्शवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *