नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील लोहा व नायगाव तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
लोहा शहरातील श्रीराम नगर येथे २८ जून रोजी सायंकाळी ४ ते २९ जून रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातील सुमारे २ लाख ८ हजार ४३० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून नेले. याप्रकरणी तुकाराम रामराव दहिफळे (वय ४४, रा. श्रीराम नगर, लोहा) यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२६/२०२६ कलम ३०५, ३३१(४) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. पांचाळ करीत आहेत.
दुसरी घटना नायगाव येथील व्यंकटेश नगरमध्ये घडली. २६ जून रोजी पहाटे ५.३० ते २८ जून रोजी सकाळी ११.४५ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लोखंडी पेटीतील ९ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी माधव धोंडीबा कोकरे (वय ५४, रा. व्यंकटेश नगर, नायगाव) यांच्या फिर्यादीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५२/२०२६ कलम ३०५, ३३१(३)(४) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भगत करीत आहेत.
दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
Post Views: 28
