पाईप्समध्ये अडकलेल्या रानगव्याची यशस्वी सुटका:वन विभाग आणि स्थानिक यंत्रणांनी थरारक बचाव मोहीम राबवली




सिंहगड रस्ता परिसरातील विश्रांती नगर येथे पाणीपुरवठा वाहिनीच्या दोन मोठ्या पाईप्समध्ये अडकलेल्या एका रानगव्याची वन विभाग आणि इतर यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वी सुटका करण्यात आली. मंगळवारी दुपारी ही आव्हानात्मक बचाव मोहीम पार पडली. मंगळवारी सकाळी ११:५१ वाजता सिंहगड रस्त्यावरील विश्रांती नगर, कॅनॉल रोड येथे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वाहिनीच्या दोन मोठ्या पाईप्समध्ये एक रानगवा अडकल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. नागरिकांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच पुणे वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. रानगवा पाईप्सच्या किचकट आणि अडचणीच्या जागेत अडकल्यामुळे त्याची सुटका करणे आव्हानात्मक होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रानगव्याला भूल देण्यात आली. त्यानंतर एका मोठ्या क्रेनच्या साहाय्याने तीन तासांच्या प्रयत्नानंतर त्याला पाईप्समधून बाहेर काढण्यात आले. या मोहिमेत पुणे वन विभाग, पुणे शहर पोलिस, अग्निशमन दल, पुणे महानगरपालिका, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी समन्वय साधत काम केले. यशस्वी सुटकेनंतर रानगव्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला पुढील उपचार आणि देखरेखीसाठी बावधन येथील वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. या संदर्भात उपवनसंरक्षक अभिजित वायकोस म्हणाले, “अशा बचाव मोहिमांमध्ये सर्व यंत्रणांमधील समन्वय आणि त्वरित प्रतिसाद महत्त्वाचा असतो. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रानगव्याला कोणतीही मोठी दुखापत न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. उपचार पूर्ण झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *