महापालिकेच्या तोंडावर ठाकरे गटाला उत्तर मुंबईत मोठे खिंडार: तेजस्वी घोसाळकर यांचा आज भाजप प्रवेश, पक्षात नाराज असल्याची होती चर्चा – Mumbai News

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. उत्तर मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या घोसाळकर घराण्यातील महत्त्वाच्या सदस्या, दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी

.

मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. ठाकरे गटातील असंतुष्ट नेत्यांना आणि प्रभावी चेहऱ्यांना गळाला लावण्याचे धोरण भाजपने अवलंबले असल्याचे दिसून येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेले हे पक्षांतराचे सत्र ठाकरे गटाची डोकेदुखी वाढवणारे आहे. त्यातच मातोश्रीशी एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या ‘घोसाळकर’ कुटुंबातील तेजस्वी घोसाळकर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.

दादरमध्ये पक्षप्रवेश सोहळा

दादर येथील भाजपचे मुख्य कार्यालय असलेल्या ‘वसंत स्मृती’ येथे आज सकाळी 10 वाजता हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या साक्षीने तेजस्वी घोसाळकर हाती ‘कमळ’ घेतील. एका कट्टर शिवसैनिक कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती, जिचा स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव आहे, तीच प्रतिस्पर्धी पक्षात गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबई बँकेच्या निवडीने दिले होते संकेत

गेल्या काही काळापासून तेजस्वी घोसाळकर ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. या नाराजीच्या चर्चेवर शिक्कामोर्तब तेव्हा झाले, जेव्हा नुकतीच भाजपची सत्ता असलेल्या ‘मुंबई बँके’च्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशाची पहिली पायरी मानली जात होती. अखेर आज त्यावर अधिकृत मोहोर उमटवण्यात आली आहे. घोसाळकर कुटुंबाचा दहिसर आणि उत्तर मुंबई पट्ट्यात मोठा जनाधार आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आगामी निवडणुकीत भाजपला मोठी ताकद मिळणार आहे, तर शिवसेनेला आपला बालेकिल्ला राखण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

तेजस्वी घोसाळकर या मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका आहेत. त्याशिवाय ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत. एक वर्षापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांच्या पतीचे गोळीबारात निधन झाले होते. यंदाच्या महापालिका निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर या निवडणूक लढणार नाहीत. वार्ड क्रमांक 1 हा ओबीसी राखीव झाल्याने निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. परंतु पालिकेच्या वार्ड क्रमांक 7, 8 किंवा 2 मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहतील असे बोलले जात होते.

निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे सत्र

सध्या संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, येत्या 20 डिसेंबरला उर्वरित मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुका पार पडताच जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईसह इतर महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेले हे पक्षांतराचे सत्र ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *