2019 मतदार ठरवणार सातारा जिल्हा बँकेचा सत्तासमीकरणाचा कौल:21 संचालकांसाठी पडद्यामागे मोर्चेबांधणी; सोसायटी मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष

[ads1]


सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणुकीतील प्रमुख आकडे स्पष्ट झाले असून, २१ संचालकांच्या निवडीसाठी २ हजार १९ मतदार पात्र ठरले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा २२१ मतदार कमी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघनिहाय संख्येपेक्षा प्रत्येक मतदाराची राजकीय ‘किंमत’ वाढली आहे. विभागीय सहनिबंधकांकडे झालेल्या सुनावणीत ४९ ठरावांवर निर्णय झाला. कच्च्या यादीतील २ हजार २७ मतदारांपैकी आठ ठराव बाद झाल्याने अंतिम यादी २ हजार १९ मतदारांवर आली. बँकेचा विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल २२ नोव्हेंबरला संपत असल्याने ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठका, गाठीभेटी आणि मतदारांची जुळवाजुळव याला आतापासूनच सुरुवात होण्याची शक्यता आहे. जवळपास निम्मा कौल सोसायटींच्या हाती या निवडणुकीतील सर्वांत मोठे राजकीय गणित सोसायटी मतदारसंघाचे आहे. या मतदारसंघात तब्बल ९६३ मतदार असून एकूण मतदारांपैकी जवळपास ४८ टक्के मतदार याच गटात आहेत. सातारा व कराड प्रत्येकी १४६, फलटण १३१, पाटण १०४, खटाव १०२, कोरेगाव ९०, माण ७५, वाई ५९, खंडाळा ५०, जावळी ४८ आणि महाबळेश्वर १२ अशी तालुकानिहाय संख्या आहे. इतर मतदारसंघांमध्ये औद्योगिक, विणकर व मजूर संस्था ३४३, गृहनिर्माण व दूध संस्था २९५, नागरी बँका-पतसंस्था १७९, कृषी प्रक्रिया २९ आणि खरेदी-विक्री संघ १० मतदार आहेत. महायुतीसमोर ‘एकत्र’ येण्याचे आव्हान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनलची परंपरा असली, तरी यंदा महायुतीतील अंतर्गत राजकारणाचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे. भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा हुमगाव सोसायटी मतदारसंघातील ठराव असल्याने त्यांची भूमिका आणि स्थानिक पातळीवरील मोर्चेबांधणीही महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील महायुतीतील ताणतणाव ताजे असताना जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे महायुतीची एकजूट टिकते की स्थानिक राजकारणात स्वतंत्र सत्ताकेंद्रे उभी राहतात, याची पहिली कसोटी जिल्हा बँकेत लागण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत संचालकांच्या बैठका आणि अनौपचारिक गाठीभेटींमधून मतदारसंघनिहाय उमेदवारी, पॅनलची रचना आणि संभाव्य समझोत्यांची दिशा ठरणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही सहकारातील सत्तेसोबतच जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांचीही लिटमस टेस्ट ठरण्याची चिन्हे आहेत.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *