सुरक्षा:आसाम-मणिपूर सीमा; 1 हजार ट्रक अडकले, आंदोलनाचा इशारा




आसाम-मणिपूर सीमेवर इंधन, एलपीजी आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे १ हजारांहून अधिक ट्रक सध्या सुमारे १५ किलोमीटर लांब रांगेत अडकले आहेत. हे ट्रक आसाममधील हमारखाव्लिएन (फुलेर्तल) ते मणिपूरमधील लेंगांगपोकपी (जिरीबाम) या मार्गावर विविध ठिकाणी थांबले आहेत. इम्फाळपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी चालक सुरक्षा ताफ्याची प्रतीक्षा करत आहेत. ट्रक अडकण्यामागील प्रमुख कारण म्हणजे एनएच-३७ (इम्फाळ-जिरीबाम) मार्गावरील अनेक ठिकाणी झालेली भूस्खलने आणि रस्त्याची अत्यंत खराब अवस्था. याशिवाय सुरक्षा ताफ्याची कमतरता तसेच मणिपूर पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांमधील समन्वयाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. गेल्या काही दिवसांत १५० ते २७५ ट्रकांचे काही ताफे मार्गस्थ करण्यात आले होते. मात्र, पुढे अनेक ठिकाणी वाहने चिखल आणि भूस्खलनात अडकली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप ट्रकचालकांनी केला आहे. या वाहनांत पेट्रोल, डिझेल, एलपीजी, एव्हिएशन टर्बाइन इंधनासह अन्नधान्य अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक आहेत. इंधन, गॅस, वस्तूंचा पुरवठा ठप्प होण्याची शक्यता ऑल मणिपूर रोड ट्रान्सपोर्ट अँड मोटर वर्कर्स युनियनचे (चालक संघटना) सरचिटणीस एम. ए. मेईतेई यांनी इशारा दिला की, ३० जूनपर्यंत एनएच-३७ची दुरुस्ती झाली नाही तर १ जुलैपासून चक्काजाम आंदोलन सुरू केले जाईल. त्यामुळे राज्यातील इंधन, एलपीजी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो. सध्या एनएच-३७ हा मणिपूरला जोडणारा एकमेव कार्यरत राष्ट्रीय महामार्ग आहे. एनएच-२ जवळपास बंद असल्याने राज्यात महागाई वाढत असून सर्वसामान्यांना अत्यावश्यक वस्तूंच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर भूस्खलनाच्याही घटना घडतात. त्यातून सुरक्षा ताफ्यांची कमतरता जाणवते, अशी तक्रारही वाहतुकदारांकडून ऐकायला मिळते. यातून वाहतूक मंदावते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *