![]()
राज्यात विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चाची घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना, “सरकारविरोधात एखादा मुद्दा मिळाला की विरोधी पक्ष त्याचा फायदा घेतो. तेच त्यांचे काम असते,” असे म्हणत विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केले. ठाकरे बंधूंच्या आंदोलनाबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले, “सरकारच्या विरोधात एखादा विषय मिळाला की विरोधी पक्ष त्याचा फायदा घेतात. ते लोकांसमोर तो मुद्दा मांडतात, त्यावर चळवळ उभी करतात. त्यामध्ये काही चुकीचे आहे, असे मी म्हणणार नाही. कारण विरोधी पक्षाचे कामच सरकारच्या विरोधात भूमिका मांडण्याचे असते. सरकार चुकले किंवा नाही चुकले तरी सरकारविरोधात बोलणे हे विरोधकांचे काम आहे.” ‘लाठीमारावेळी पोलिसांनी अधिक संयम दाखवायला हवा होता’ विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमारावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “काही उत्साही कार्यकर्त्यांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जो लाठीमार झाला, त्यावेळी पोलिसांनी थोडी अधिक संयमित भूमिका घेणे गरजेचे होते, असे मला वाटते.” ‘फास्ट ट्रॅक न्यायालयाचा निर्णय योग्य’ नीट पेपरफुटी प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करत भुजबळ म्हणाले, “पेपरफुटीप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झाली तर भविष्यात अशा घटना रोखता येतील. अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित राहतात आणि लोक ती विसरून जातात. त्यामुळे फास्ट ट्रॅक न्यायालयाचा निर्णय योग्य आहे.” ‘प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने आंदोलन करेल’ वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, “प्रत्येक विरोधी पक्ष आपापल्या पद्धतीने आंदोलन करणार. कोणी महाराष्ट्र बंद करेल, कोणी मुंबई बंद करेल, कोणी उपोषण करेल. लोकशाहीत हे सुरूच राहणार.” ‘आम्हीही विरोधात असताना आवाज उठवत होतो’ विद्यार्थी आंदोलनामागे राजकीय पक्ष सक्रिय झाल्याच्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, “सरकारविरोधात एखादा मुद्दा मिळाला की विरोधी पक्ष त्यावर आवाज उठवतो. आम्हीही विरोधी पक्षात असताना तसेच करत होतो. काँग्रेस, भाजप, शिवसेना किंवा कोणताही विरोधी पक्ष असो, सरकारविरोधातील मुद्द्यांवर आवाज उठवणे हे त्यांचे कर्तव्यच असते.” हे ही वाचा… विद्यार्थी आंदोलनात देशविरोधी घोषणा का?:देशहिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी शोभत नाहीत, त्यांनी आपल्या उंचीनुसार बोलावले – नीतेश राणे राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधत, “देशहिताच्या आणि तरुणांच्या हिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी शोभत नाहीत,” अशी टीका केली. नीट परीक्षा आणि त्यावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर आरोप करत केंद्र सरकार परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पावले उचलत असल्याचा दावा केला. सविस्तर वाचा…
सरकारविरोधात मुद्दा मिळाला की विरोधक फायदा घेतात:ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, पोलिसांच्या भूमिकेवरही भाष्य
