Marijuana worth eight lakhs seized in Sangamner city at midnight, 32 kg of marijuana seized, four accused arrested | संगमनेर शहरात मध्यरात्री आठ लाखांचा गांजा जप्त: 32 किलो गांजा जप्त, चार आरोपी अटकेत‎ – Ahilyanagar News



संगमनेर शहर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत ८.२१ लाखांचा ३२.८४५ किलो सुका गांजा जप्त केला. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली. अवघ्या २४ तासांत पुन्हा मोठी कारवाई झाल्याने संगमनेरमधील अंमली पदार्थाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे.

.

गुरुवारी नाशिक नार्कोटिक सेलने सुकेवाडीत तब्बल सव्वा कोटींचा ४५६ किलो गांज्याचा साठा उघडकीस आणला होता. यानंतर लगेचच शहर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री कारवाई केली. पहाटे १.४५ ते ४.३० दरम्यान केशव तिर्थ, गाळा क्रमांक २, गोल्डन सिटी येथे टाकलेल्या छाप्यात शुभम चंद्रकांत जाधव, विशाल अशोक गायकवाड, प्रथमेश अशोक पावडे आणि परवेझ दाऊद शेख हे चौघे जण सुका गांजा विक्रीसाठी प्लास्टिकच्या गोण्या तयार ठेवताना पोलिसांना आढळले. या प्रकरणी पोलिस नाईक विजय खुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक १०७३/२०२५ दाखल झाला आहे. संशयित आरोपींवर एनडीपीएस कायद्याचे कठोर कलम ८ (क), २० (ब) आणि २२ (ब) यांनुसार गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक समीर बारवकर आणि पीएसआय श्रीकांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केली. पुढील तपासातून पोलिसांना या रॅकेटची मूळ साखळी, पुरवठादार आणि शहरातील उरलेल्या जाळ्याचा मागोवा घेण्यास मदत होणार आहे.

अमली पदार्थ विक्रीचे मोठे जाळे संगमनेर शहराला गेल्या काही महिन्यांपासून अवैध व्यवसायांचा कलंक लागत आहे. गोवंशांची अवैधरित्या विक्री असो किंवा अमली पदार्थ यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. संगमनेर शहरात बाहेरील तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीसाठी येत असतो. शहरातील काही ठिकाणी या गांजाच्या पुड्या बनवून त्याची विक्री केली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका महागड्या कारमधून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी नेणाऱ्याला अटक केली. तर बुधवारी १ कोटी १४ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *