ऋतुराज गायकवाडला मोठी संधी! विराट कोहलीला करणार रिप्लेस, भारतीय संघात महत्त्वाचे बदल
Ruturaj Gaikwad| भारतीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात ६ जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार असून, त्यानंतर १३ जूनपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वीच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे बाहेर पडल्याची बातमी समोर आली होती. आता या संदर्भात एक मोठी घडामोडी समोर येत असून, एकदिवसीय संघात विराटच्या जागी महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचा समावेश केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मालिकेसाठी ऋतुराजचे नाव आघाडीवर
‘इंडियन एक्सप्रेस’ (Indian Express) ने दिलेल्या वृत्तानुसार, हॅमस्ट्रिंगच्या (Hamstring) दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या विराट कोहलीच्या रितसर पर्यायाचा शोध सुरू असून त्यात ऋतुराजचे नाव सर्वात पुढे आहे. काही दिवसांपूर्वीच ‘इंडिया ए’ (India A) संघाच्या श्रीलंका (Sri Lanka) दौऱ्यासाठी रियान पराग (Riyan Parag) याच्या जागी ऋतुराजची निवड करून त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, आता त्याला थेट मुख्य राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याचा दावा केला जात असल्याने, ‘इंडिया ए’ संघात त्याच्या जागी कोणाला पाठवायचे, असा पेच निवडकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे. ऋतुराजला संघात स्थान मिळाल्यास भारताला मधल्या फळीतील फलंदाजासोबतच एक सक्षम सलामीवीर म्हणूनही चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
गायकवाडची कामगिरी आणि पाटीदारला लॉटरी
ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत भारतासाठी ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना २८.५० च्या सरासरीने धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने आपला अखेरचा एकदिवसीय सामना डिसेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) खेळला होता, जिथे त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावले होते.
दुसरीकडे, ऋतुराज मुख्य संघात गेल्यास ‘इंडिया ए’ संघात निर्माण होणाऱ्या रिक्त जागेवर मध्य प्रदेशच्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याला संधी दिली जाऊ शकते. रजत पाटीदारने नुकतेच आपल्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाला सलग दुसऱ्यांदा आयपीएल (IPL) चे विजेतेपद मिळवून दिले असल्याने तो सध्या कमालीच्या फॉर्मात आहे.
News Title: Ruturaj Gaikwad Replaces Virat Kohli ODI
