टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का! विराट पाठोपाठ रोहित शर्माही वनडे मालिकेतून बाहेर

0
Rohit-Sharma-Virat-Kohli-ODI-Retirement-Rumors-.webp.webp


Rohit Sharma| अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला सलग दुसरा मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली (Virat Kohli) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेल्यानंतर आता रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खेळण्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे १३ जूनपासून सुरू होणाऱ्या मालिकेआधी टीम इंडियाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रोहितच्या फिटनेसबाबत संभ्रम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अफगाणिस्तान मालिकेसाठी संघ जाहीर करताना रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच मैदानात उतरेल, असे स्पष्ट केले होते. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया (Devajit Saikia) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी त्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली होती. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहितच्या सहभागाबाबत अजूनही साशंकता कायम आहे.

आयपीएल (IPL) २०२६ दरम्यान रोहित शर्माला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. त्याने स्पर्धेतील ९ सामन्यांत ३५.३७ च्या सरासरीने २८३ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १५७.२२ इतका होता. या काळात त्याने दोन अर्धशतके झळकावली असून ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटलाही अलविदा करत तो आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे.

रोहित-विराटच्या अनुपस्थितीची चर्चा

रोहित शर्माने मार्च २०२५ मध्ये भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) जिंकून दिली होती. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. गेल्या वर्षभरात त्याने १४ एकदिवसीय सामन्यांत ६५० धावा करत भारतासाठी दमदार कामगिरी केली. त्याची सरासरी ५०.०० तर स्ट्राइक रेट १००.४६ होता. मात्र, यावर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

दुसरीकडे, विराट कोहलीही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेला आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध अहमदाबाद (Ahmedabad) येथे झालेल्या आयपीएल अंतिम सामन्यात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघासाठी ४२ चेंडूत नाबाद ७५ धावा केल्या होत्या. मात्र त्याच सामन्यात त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत असल्याचे दिसून आले होते. रोहित आणि विराट या दोन्ही माजी कर्णधारांनी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने ते आता फक्त एकदिवसीय सामने खेळत आहेत. २०२७ च्या विश्वचषकापूर्वी मोजक्याच मालिका उरल्या असताना या दोघांनाही पुरेसा सामना सराव मिळत नसल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

News Title: Rohit Sharma Virat kohli Out Of India vs Afghanistan ODI Series

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *