महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती:रमेश चेन्नीथला यांच्या जागी निवड; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हायकमांडचा मोठा निर्णय

[ads1]


महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच अनेक घडामोडी घडत असतात. सध्या राज्यात महायुतीची सत्ता असली, तरी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली असून, तरुणाई आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी नुकताच पुण्यात राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम पार पडला. याच रणनीतीचा एक भाग म्हणून आता थेट दिल्लीहून आलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती केली आहे. आंध्र प्रदेशातील नेते असलेले डॉ. प्रसाद यांनी यापूर्वी झारखंडचे प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. प्रभारी म्हणून काम करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता, रमेश चेन्नीथला यांच्या जागी आता त्यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या नव्या कारकिर्दीत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आगामी काळात नेमके कोणते धोरणात्मक बदल पाहायला मिळतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिक्त पदानंतर नवी नियुक्ती डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या आधी केरळचे नेते रमेश चेन्नीथला यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी होती. मात्र, त्यांच्याकडे केरळच्या गृहमंत्रिपदाची सूत्रे आल्याने गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्राचे प्रभारीपद रिक्त होते. अखेर शनिवारी दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडून देशभरातील एकूण सहा राज्यांच्या प्रभारींची अधिकृत निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्याकडे देण्यात आली आहे. पक्षापुढील आव्हाने आणि वाटचाल सध्या राज्यात काँग्रेस पक्षासमोर अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. राज्यात हर्षवर्धन सपकाळ हे पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी एकाकी प्रयत्न करत असल्याचे चित्र असून, त्यांच्यासोबत सर्वांना आकर्षित करू शकेल असा दुसरा प्रबळ नेता सध्यातरी दिसत नाही. दुसरीकडे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे. या सर्व राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटनेत कोणते बदल होणार आणि काँग्रेस पक्ष या आव्हानांना कसा सामोरा जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *