मी एकनाथ शिंदे यांना खूप मानते:त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आपली मराठी संस्कृती जपते- गौतमी पाटील

[ads1]


मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे सण अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. दहीहंडी उत्सवात अनेक बडे सेलिब्रिटी आणि सिनेतारका उपस्थित राहून आपल्या नृत्याविष्काराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या उत्सवांमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिनेही मुंबईकरांवर विशेष मोहिनी घातली असून, मुंबई आणि परिसरातील दहीहंडीत तिच्या कार्यक्रमांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदाही नवी मुंबईतील ऐरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलने आपल्या नृत्याचा जलवा दाखवत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमानंतर बोलताना तिने एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. मी एकनाथ शिंदे यांना खूप मानते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आपली मराठी संस्कृती जपत आहे, अशी प्रतिक्रिया गौतमीने यावेळी दिली. नवी मुंबईतील ऐरोली येथे आयोजित शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवात नृत्यांगना गौतमी पाटील हिने सहभाग घेत आपल्या नृत्याविष्काराचा जोरदार जलवा दाखवला. यावेळी ‘पाटलांचा बैलगाडा’ यासह अनेक लोकप्रिय गाण्यांवर गौतमी थिरकली, ज्यामुळे उपस्थित तरुणाईने मोठा जल्लोष केला. गौतमीच्या या दिलखेचक अदांवर नवी मुंबईकर अक्षरशः फिदा झाल्याचे या उत्साही वातावरणात पाहायला मिळाले. या कार्यक्रमानंतर आयोजकांचे आभार मानताना गौतमीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, ऐरोलीतील ही शिवसेनेची दहीहंडी माझी घरची दहिहंडी आहे, गेल्या अनेक वर्षापासून मी इथे येत आहे. नवी मुंबईकरांच प्रेम मला मिळत आहे, मान-सन्मान मला मिळतो. तसेच, सण-संस्कृतीबाबत बोलताना तिने स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी सण, संस्कृती टिकली पाहिजे असे आवाहन केले आहे. मी देखील एकनाथ शिंदेंना खूप मानते, त्यांच्या आवाहनाला अनुसरुनच मी काम करीत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गोविंदा पथकांनी स्वत:ची काळजी घेऊनच हा उत्सव साजरा करायला हवा, असा सल्लाही गौतमीने यावेळी दिला. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात दिवसभर दहीहंडीचा उत्साह जराही ओसरलेला दिसला नाही. उलटपक्षी, जसजशी संध्याकाळ होऊ लागली, तसतसा मानवी थर रचणाऱ्या गोविंदांचा आणि त्यांचे हे चित्तथरारक थर पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांचा उत्साह आणखीनच दुणावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *