अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाला अखेर दिलासा:नागेश भोईरच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मंत्री प्रताप सरनाईक उचलणार, कुटुंबालाही आर्थिक मदत

[ads1]


मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी उत्सव मानवी मनोऱ्यांच्या उंचीमुळे नेहमीच चर्चेत असतो, मात्र याच उत्सवात गोविंदा जखमी होण्याच्या घटना सातत्याने समोर येतात. 2009 सालच्या अशाच एका दुर्घटनेत थरावरून कोसळल्यामुळे नागेश भोईर हा गोविंदा गंभीर जखमी झाला होता आणि तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून आहे. यंदाच्या उत्सवातही काही गोविंदा जखमी झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक दिलासादायक निर्णय घेत गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणात खितपत पडलेल्या नागेश भोईरच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भिवंडीतील गोविंदा नागेश भोईर याच्या आयुष्याला 2009 सालच्या दहीहंडी उत्सवाने एक अत्यंत वेदनादायी वळण दिले. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी दहीहंडीचे थर रचताना तो उंचावरून थेट जमिनीवर कोसळला. या भीषण अपघातात त्याच्या मणक्याला इतकी गंभीर दुखापत झाली की, रुग्णालयातील मोठ्या उपचारांनंतरही त्याला कायमचे अपंगत्व आले. तेव्हापासून त्याला पुन्हा कधीही स्वतःच्या पायावर उभे राहता आले नाही आणि सामान्य व्यक्तीसारखे जगण्याचे त्याचे स्वप्न भंगले. गेली 18 वर्षे तो अंथरुणाला खिळून आहे. सरकारकडे मदतीची साद अपघातानंतर नागेशला केवळ शारीरिक नव्हे, तर मोठ्या आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागले. सुरुवातीच्या काळात मित्रमंडळी आणि परिचितांनी त्याला बरीच मदत केली, मात्र काळानुसार मदतीचा हा ओघ आटत गेला. नुकतेच नागेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील हा कटू प्रसंग मांडला आणि उपचारांचा खर्च पेलणे किती दुरापास्त झाले आहे, हे जगासमोर आणले. शासनाने केवळ तुटपुंजी आर्थिक मदत देण्याऐवजी आपल्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलावा, अशी आर्त मागणी त्याने या माध्यमातून केली होती. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मदतीचा हात नागेशच्या या संघर्षाची आणि मागणीची दखल घेत मंत्री प्रताप सरनाईक त्याच्या मदतीला धावून आले आहेत. ‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’च्या दहीहंडी उत्सवादरम्यान सरनाईक यांनी एक अत्यंत दिलासादायक घोषणा केली. या घोषणेनुसार, गोविंदा नागेश भोईर याच्या पुढील उपचारांचा संपूर्ण भार ते स्वतः उचलणार आहेत. याव्यतिरिक्त, गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या नागेशच्या कुटुंबाला आधार म्हणून पाच लाख रुपयांची थेट आर्थिक मदत देण्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *