पुण्यात 'सुवर्णयुग'च्या दहीहंडीचा थरार:कसबा पेठेच्या राधेकृष्ण ग्रुपने 7 थर रचून फोडली हंडी

[ads1]


बोल बजरंग बली की जय… च्या जयघोषात पुण्यासह महाराष्ट्रातील गोपाळ भक्तांसाठी प्रमुख आकर्षण असलेल्या बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून फोडली. शनिवारी रात्री ९ वाजून २२ मिनीटांनी चौथ्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या गोविंदाने हंडी फोडली. बेलबाग चौकाजवळ असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या पारंपरिक जागेत जय गणेश प्रांगण येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, अमोल चव्हाण, तुषार रायकर, प्रतिक घोडके यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सुवर्णयुग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव पाहण्याकरिता गोपाळ भक्तांनी मोठी गर्दी झाली होती. भव्य एलईडी स्क्रिनवरुन श्रीकृष्ण लीला दर्शन गोपाळभक्तांना झाले. कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला रुपये ५१ हजार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मच गया शोर… बोल बजरंग बली की जय… यांसारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला. सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टच्या वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती, असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *