ध्वनीप्रदूषणाविरुद्धचा पहिला आवाज!:'जुलमाचे श्रोते' संकल्पना मांडली, शांततेचा कायदेशीर अधिकार मिळवून दिला, कोण आहेत मूक क्रांतीचे नायक डॉ. यशवंत ओक?

[ads1]


आजच्या काळात पुण्यामध्ये डीजेच्या भीषण आवाजाविरोधात उठणारा विद्यानंद बापट यांचा आवाज नवीन वाटत असला, तरी या लढ्याची पायाभरणी 80 च्या दशकातच एका द्रष्ट्या डॉक्टरने केली होती—ते नाव म्हणजे डॉ. यशवंत ओक. ज्या काळात मोठा आवाज हाच उत्सवाचा उत्साह मानला जायचा, त्या काळात त्यांनी आवाजाच्या या दहशतीविरुद्ध कायदेशीर आणि वैज्ञानिक लढा पुकारला. देशात आज अस्तित्वात असणारे ध्वनिप्रदूषणाचे कडक नियम आणि शांतता क्षेत्रांची संकल्पना ही त्यांच्याच दूरदृष्टीची फलश्रुती आहे. डॉ. यशवंत ओक यांच्यासमोर वैद्यकीय क्षेत्रात उच्च पदवी मिळवून परदेशात स्थायिक होण्याचा पर्याय समोर असतानाही, त्यांनी मायदेशी परतत समाजाला घातक ठरणाऱ्या समस्येविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. भारतात ध्वनिप्रदूषणाविरोधात कायदेशीर आणि सामाजिक क्रांती घडवून आणण्यात त्यांचे योगदान ऐतिहासिक मानले जाते. वैद्यकीय अभ्यासातून लढ्याची सुरुवात मुंबई मेडिकल कॉलेजमधून 1961 मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ब्रिटनची वाट धरली. तेथे अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘NHS’ (नॅशनल हेल्थ सर्व्हिस) संस्थेत त्यांनी सुमारे 5 वर्षे सेवा बजावली. उच्च शिक्षण आणि विशेष प्रशिक्षण पूर्ण करून 1967 मध्ये ते भारतात परतले आणि विलेपार्ले येथे त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. इंग्लंडहून मायदेशी परतल्यावर डॉ. ओक यांना येथील वाढत्या गोंगाटाची भीषणता जाणवली. त्यांनी या समस्येकडे केवळ एक नागरिक म्हणून न पाहता वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले. केईएम रुग्णालयाचे प्रा. पी. पी. कर्णिक आणि जागतिक पातळीवरील संशोधनांचा आधार घेत त्यांनी हे सिद्ध केले की, कर्कश आवाज केवळ कानांनाच नाही, तर मानवी शरीराला आणि मानसिक आरोग्यालाही गंभीर इजा पोहोचवतो. वैयक्तिक त्रासापासून सार्वजनिक चळवळीपर्यंत डॉ. ओक यांच्या संघर्षाची सुरुवात त्यांच्या राहत्या घराच्या शेजारील औद्योगिक आवाजाविरोधात झाली. 1979 च्या सुमारास ध्वनिप्रदूषणामुळे मानवी शरीरावर, विशेषतः रक्तदाबावर गंभीर परिणाम होतात, या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. यासंदर्भात एका जर्मन संशोधकाने केलेल्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज त्यांनी मागवून घेतले. याच काळात त्यांच्या राहत्या घराशेजारील एका औद्योगिक युनिटविरुद्ध त्यांनी लोकवस्तीतील आवाजाच्या त्रासाचे कारण देत तक्रार नोंदवली. या पहिल्याच लढ्यात त्यांना यश आले आणि त्या युनिटचा परवाना रद्द करण्यात आला. त्यानंतर 1980 च्या सुमारास मुंबईत सुरू झालेल्या ‘डिस्को दांडिया’ आणि मैदानांवरील रात्रभर चालणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या त्रासाविरुद्ध त्यांनी नागरिकांना एकत्र केले. ‘सोसायटी फॉर क्लीन एन्व्हायर्नमेंट’च्या माध्यमातून त्यांनी माहिती गोळा करून वृत्तपत्रांद्वारे जनजागृती केली. यातून हे स्पष्ट झाले की, हा त्रास काही मोजक्या लोकांचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. गणेशोत्सवातील ध्वनिक्षेपकांविरुद्ध ऐतिहासिक याचिका सार्वजनिक स्तरावर आवाजाची मर्यादा राखली जावी यासाठी डॉ. ओक यांनी 1985 मध्ये वकील व डॉक्टर मित्रांच्या सहकार्याने न्यायालयात दाद मागितली. सणांच्या काळात, विशेषतः रात्री 11 नंतर वाजणाऱ्या अफाट आवाजाच्या ध्वनिक्षेपकांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी या याचिकेद्वारे लावून धरली. न्यायालयाने डॉ. ओक यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेत निर्णय त्यांच्या बाजूने दिला. पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत आवाजाचे प्रदूषण करणाऱ्यांवर 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि 5 वर्षांच्या कारावासाची कडक तरतूद करण्यात आली. देशात ध्वनिप्रदूषणावर असा कडक कायदा लागू होण्याची ही पहिलीच वेळ होती. न्यायालयातील ऐतिहासिक लढा 1985 मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला—”एका नागरिकाला दुसऱ्या नागरिकाच्या आवाजाच्या त्रासापासून राज्य सरकार संरक्षण देऊ शकते का?” या प्रश्नाने न्यायव्यवस्थेलाही विचार करायला लावले. न्यायालयाच्या तज्ज्ञ समित्या आणि डॉ. ओक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच पुढे जाऊन केंद्र सरकारने 2003 मध्ये सन 2000 ची ‘ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियमावली’ लागू केली. ध्वनिप्रदूषण नियमावलीत महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली. ‘आवाजाचा जुलूम’ आणि शांततेचा अधिकार डॉ. ओक यांनी मांडलेली ‘जुलमाचे श्रोते’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरली. घराजवळ वाजणारा डीजे आणि बंद खिडक्यांमधूनही आत येणारा आवाज हा नागरिकांवर लादलेला असतो; ती त्यांची निवड नसते. यामुळे होणारी चिडचिड, निद्रानाश आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांकडे लक्ष वेधून त्यांनी न्यायालयाला पटवून दिले की, शांतता ही चैनीची गोष्ट नसून तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत आरोग्यविषयक अधिकार आहे. “मोठा आवाज म्हणजे मोठा उत्सव नव्हे” ही वैचारिक क्रांती घडवून आणणाऱ्या आणि ध्वनिप्रदूषणाला ‘सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न’ म्हणून मान्यता मिळवून देणाऱ्या डॉ. यशवंत ओक यांचे योगदान आजच्या काळातील ध्वनिविरोधी चळवळींसाठी सदैव दिशादर्शक राहील.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *