अमरावती विधान परिषद निवडणूक:प्रवीण पोटे सर्वात श्रीमंत उमेदवार, 270 कोटींचे धनी; महल्ले सर्वात गरीब, 25 लाखांची संपत्ती, 60 लाखांचे कर्ज

0
0517b45f-da5b-494c-b314-87de8529341f_1780416671169.jpg




अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, माजी मंत्री प्रवीण पोटे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या संयुक्त कुटुंबाची एकूण मालमत्ता २७० कोटी ८७ लाख ४९ हजार ४६० रुपये आहे. याउलट, अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले हे सर्वात गरीब उमेदवार असून, त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता २४ लाख ६९ हजार ५८८ रुपये आहे, तर त्यांच्यावर ६० लाख ७७ हजार ६३२ रुपयांचे कर्ज आहे. या निवडणुकीत एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार असलेले प्रवीण पोटे हे महायुतीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार, पोटे यांच्याकडे स्वतःची १३७ कोटी ९६ लाख ११ हजार ९६० रुपयांची चल-अचल संपत्ती आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १३२ कोटी ९१ लाख ३७ हजार ५०० रुपयांची मालमत्ता दर्शवण्यात आली आहे. त्यांची एकूण संपत्ती २७० कोटींहून अधिक असून, त्यांच्यावर ४ कोटी ८० लाख ८४ हजार ६९८ रुपयांचे कर्ज आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांच्याकडे १० कोटी १ लाख ५३ हजार ४९१ रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या नावावर ८४ लाख ९७ हजार रुपयांची देणी आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे मिळून १७ कोटी १२ लाख ७३ हजार १०२ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ३ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्जही आहे. अमरावतीचे नगरसेवक असलेले प्रशांत महल्ले हे या निवडणुकीतील सर्वात कमी संपत्ती असलेले उमेदवार आहेत. त्यांची स्वतःची मालमत्ता ९ लाख ४५ हजार ८६ रुपये असून, पत्नीच्या नावावर ९ लाख २४ हजार ५०२ रुपयांची संपत्ती आहे. कुटुंबातील इतर सदस्यांची रक्कम विचारात घेता, त्यांची एकूण संपत्ती २४ लाख ६९ हजार ५८८ रुपये आहे. त्यांच्यावर ६० लाख ७७ हजार ६३२ रुपयांचे कर्ज आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, छाननीदरम्यान त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, प्रवीण पोटे यांनी बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे, तर हर्षजीत देशमुख एमबीए उत्तीर्ण आहेत. निलेश विश्वकर्मा यांनी बी.कॉम नंतर अर्थशास्त्रात एमए केले आहे, तर प्रशांत महल्ले यांनी शारीरिक शिक्षण क्षेत्रात बीपीएडची पदवी संपादन केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून असल्याने, या चौघांपैकी कोण निवडणुकीच्या रिंगणात कायम राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed