नागपुरात महिला पोलिस उपनिरीक्षक ACBच्या जाळ्यात:छेडछाडीची केस न करण्यासाठी खाजगी व्यक्तीमार्फत लाच मागितल्याचा आरोप

0
cb181266-72b8-47c7-99ff-9bdb49cd341e_1780410924775.jpg




नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वाठोडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस उपनिरीक्षकाला लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. प्रणाली बेनके असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका छेडछाडीच्या प्रकरणातून वाचवण्यासाठी त्यांनी खाजगी व्यक्तीमार्फत लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुरुवात एका तक्रारदाराने वाठोडा पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जावरून झाली. तक्रारदाराला एका महिलेकडून कामाचे कमिशन मिळाले नव्हते. या अर्जाच्या चौकशीदरम्यान, संबंधित महिलेने उलट तक्रारदाराविरुद्धच छेडछाडीची तक्रार दाखल केली. या छेडछाडीच्या तक्रारीवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आणि तक्रारदाराला वाचवण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांनी एका खाजगी मध्यस्थाच्या माध्यमातून लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने थेट नागपूर एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत आरोपी अधिकारी बेनके यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. तडजोडीअंती त्यांनी १० हजार रुपये वाठोडा पोलिस ठाण्यातच स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, नंतर तक्रारदारावर संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. लाच स्वीकारली नसली तरी, पडताळणीत लाचेची मागणी स्पष्टपणे सिद्ध झाल्याने एसीबीने त्यांना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed