रोहित पवारांची शिंदे-अजित पवार गटावर टीका:म्हणाले- दात नसलेले वाघ फक्त गुरगुरतात; तिकिटांसाठी भांडता, शेतकऱ्यांसाठी का नाही?
![]()
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र येऊन काम करावे, असे मत व्यक्त केले होते. या विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी महायुतीतील घटक पक्षांवर थेट निशाणा साधला. रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपची साथ सोडण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांच्या मते, या दोन्ही पक्षांची राजकीय ताकद मर्यादित झाली असून ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाहीत. यावेळी त्यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करत, हे दात नसलेल्या वाघांसारखे आहेत, जे फक्त गुरगुरू शकतात, असे वक्तव्य केले. सत्ताधारी गटांची अस्वस्थता ही केवळ सत्तेभोवती फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याबाबतही भाष्य केले. भविष्यात 2029 मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकली असती, म्हणून भाजपपासून वेगळे होण्याचा विचार करणारे ते एकमेव नेते असू शकले असते, असा दावा त्यांनी केला. मात्र आता अशी परिस्थिती उरलेली नाही आणि महायुतीतील कोणताही पक्ष भाजपविरोधात जाण्याचे धाडस करणार नाही, असे त्यांनी म्हटले. दुसरीकडे, आम्ही मात्र सत्तेसाठी नव्हे तर सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही रोहित पवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. कांद्याला बाजारात अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर येथे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिकनंतर पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी असल्याने त्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने कांद्याच्या दराबाबत अनेक घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला. सुरुवातीला 12.50 रुपये दर जाहीर करण्यात आला, त्यानंतर निवडणुकीपूर्वी 24 रुपये दर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कांद्याला 7 ते 8 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने किमान 24 ते 25 रुपये हमीभाव द्यावा आणि 10 लाख टन कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी केली. व्यापाऱ्यांमार्फत नव्हे तर थेट शेतकऱ्यांकडून नाफेडने कांदा खरेदी करावा, असेही त्यांनी नमूद केले. तिकिटांसाठी संघर्ष करणारे नेते शेतकऱ्यांसाठी का लढत नाही नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात खरेदी सुरू झालेली दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील बैठकीत नेमका काय निर्णय झाला याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर टीका करत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याऐवजी नेते केवळ माध्यमांसमोर बोलत असल्याचा आरोप केला. विधान परिषदेच्या तिकिटांसाठी संघर्ष करणारे नेते शेतकऱ्यांसाठी तितक्याच ताकदीने का लढत नाहीत, असा सवाल करत त्यांनी महायुती सरकारला थेट लक्ष्य केले.
