मोबाईल टॉवरचे केबल चोरी करणाऱ्या चौघांना अटक:औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, 4 मोबाईल, एक दुचाकीसह 95 हजारांचा मुद्देमाल जप्त

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-02t142737105_1780390726.jpg




औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे मोबाईल टॉवरचे केबल चोरी करणाच्या चौघांना पोलिसांच्या पथकाने पकडले असून या प्रकरणी सोमवारी ता. १ औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल, एक दुचाकीसह ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून केबल चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यात चोरी व इतर गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्त घातली जात आहे. यामध्ये शहरी भागात रात्री आकरा वाजल्यानंतर फिरणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, जमादार इम्रान सिद्दीकी, आंबादास बेले, दिलीप नाईक यांचे पथक रविवारी ता. ३१ गस्तीवर होते. जवळा बाजार शिवारात गस्त घालत असतांना सोमवारी ता. १ पहाटेच्या सुमारास एका मोबाईल टॉवर जवळ काही तरुण संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून चौघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या जवळ केबल कापण्याचे कटर, लोखंडी पाना व इतर साहित्य आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली असता ते केबल चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोबाईल, एक दुचाकी, एक कटर, हातमोजे, लोखंडी पाना व इतर साहित्य असा ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार इम्रान सिद्दीकी यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी शेख मुजाहिद उर्फ मुज्जू, शेख मतीन, सय्यद रेहान (रा. मस्तानशहा नगर हिंगोली), प्रथमेश काशीदे (रा. बावनखोली हिंगोली) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून जमादार दिलीप नाईक पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed