परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:शिंदेसेनेकडून सईद खानच्या उमेदवारी वरून ठाकरे गटाच्या आयोध्या पौळ यांची टिका
![]()
परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिंदेसेनेकडून सईदखान यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी फेसबुकवरून महायुतीच्या नेत्यांवर जहरी टिका केली. आमदार चित्रा वाघ व राणेंच्या मुलांनी तसेच महायुतीच्या नेत्यांनी उत्तर देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. परभणी –हिंगोली विधान परिषद निवडणुकीत उबाठा विरुध्द शिंदेसेना असाच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यातच महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून असलेली अंतर्गत धुसफूस उमेवारांसाठी चांगलीच अडचणीची ठरणार आहे. दरम्यान, शिंदेसेनेकडून सईदखान यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी महायुतीवर जहरी टिका केली आहे. मातोश्रीचा निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या पदाधिकाऱ्याला परभणीचा महापौर केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली, स्वतःचा ऊर बडवून घेतला. त्यावेळी त्यांच्या अंगातील हाडे बाहेर येतात की काय असे वाटले होते. मात्र आता शिंदसेनेने दिलेला सईद खान हा मुस्लीम उमेदवार नाही का असा सवाल केला. या उमेदवारीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (एकूमामा) त्यांचे ढोंगीपण आता स्वतःच उघडे करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान,सईद खान यांना महायुतीचे मतदार मतदान करणार का किंवा हिरवा साप म्हणून दुर्लक्ष करणार याचे आमदार चित्रा वाघ व राणेच्या मुलांनी तसेच महायुतीच्या नेत्यांनी उत्तर द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आयोध्या पौळ यांनी फेसबुक पोस्ट करून केलेली टिका आता महायुतीच्या नेत्यांना चांगलीच झोंबत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात आमदार चित्रा वाघ यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
