लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र:CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले- कोणत्याही पात्र बहिणीला वगळले नाही

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-02t111553331_1780379228.jpg




मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची पूर्तता न करणे, आवश्यक निकष पूर्ण न होणे आणि अर्जांमधील त्रुटींमुळे राज्यातील तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या असून, त्यांना दरमहा मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत आता बंद झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, या वाढत्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतून वगळलेले नाही. डेटाबेसनुसार आणि निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, तसेच ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषात बसत नाही आणि ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या ऐंशी लाख लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आले आहे. पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडे केलेल्या तपासणीत चार ते पाच लाख लाभार्थी असे निघाले ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे. अजूनही काही महिलांना वाटत असेल की, त्या पात्र असून त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी आहे. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली, तेव्हा या योजनेचे निकष होते. उत्पन्नाचे निकष होते. वयाचे निकष होते, शासकीय नोकरी असेल तर योजनेचा फायदा घेता येणार नाही. चारचाकी गाडी असेल तर योजनेत सहभागी होता येणार नाही, असे अनेक निकष होते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आठ महिने केवायसी विंडो ओपन ठेवली पुढे माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुरुवातीला योजना सुरू करताना सेल्फ सर्टिफिकेशन वर योजनेचा लाभ देण्यात आला. तेव्हा पडताळणी केली असती तर त्यात एक ते दीड वर्ष गेला असता. त्यामुळे तेव्हा पडताळणी न करता या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, योजनेला देण्यात येणारा पैसा हा जनतेचा पैसा आहे त्यामुळे CAG ऑडिट केले जाते. त्यांच्याकडून विचारले जाते की याची पडताळणी तुम्ही केली आहे का? त्यामुळे निकषांची पडताळणी करण्याकरिता सुरुवात करताना केवायसी पडताळणी केली. आठ महिने केवायसी विंडो ओपन ठेवली. यामध्ये ज्या महिला आल्या त्यांना पात्र केले. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांविषयी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत असताना बावनकुळे म्हणाले, काही नावे कमी झाली आहेत, याचा अर्थ ती कायमस्वरूपी कमी झाली आहेत, असा अजिबात होत नाही. तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांमधील त्रुटींमुळे काही नावे तात्पुरती बाजूला ठेवली जाऊ शकतात, परंतु सरकार या प्रकरणांची पुन्हा तपासणी करेल. अर्जामध्ये किंवा प्रक्रियेत काही चूक असेल, तर ती नक्कीच दुरुस्त केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed