वाई शिवारात दारु अड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिस पथकावर हल्ला:एक कर्मचारी जखमी, तीन जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
whatsapp-image-2026-06-02-at-104106-am_1780378352.jpeg




कळमनुरी तालुक्यातील वाई शिवारात दारु अड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यावर गुप्तीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणणे व जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून सोमवारी ता. १ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी विशेष पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्यावर छापे टाकले जात आहेत. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील वाई शिवारातील एका शेतात बेकायदेशीररित्या दारु विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे जमादार सतीष जाधव, लिंबाजी वाहुळे यांच्या पथकाने तातडीने वाई शिवारात जाऊन दारु अड्यावर छापा टाकला. पोलिसांनी दारु जप्त करून कारवाई करीत असतांना बबलू उर्फ हनुमानसिंग टाक व त्याचा भाऊ करतारसिंग टाक व अन्य एक जण तेथे आला. त्यांनी दोनच पोलिस कर्मचारी पाहून त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. मात्र यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर पोलिसांना ट्रकने उडवावे लागत असे म्हणत त्यांच्या जवळील गुप्ती काढून जमादार जाधव यांच्यावर वार केला. मात्र त्याचा वार चुकविण्याच्या प्रयत्नात जाधव यांच्या बोटावर गुप्तीचा वार झाल्याने ते जखमी झाले. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, उपनिरीक्षक सतीष ठेंगे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येत असल्याचे लक्षात येताच तिघांनीही पळ काढला. या प्रकरणी जमादार जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बबलू टाक, करतारसिंग टाक याच्यासह अन्य एका विरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शेवाळे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed